अवघ्या बाराव्या वर्षीच अभिमन्यू मिश्रा ग्रँडमास्टर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 July 2021

अनिवासी भारतीय असलेल्या अभिमन्यू मिश्राने जगातील सर्वात लहान ग्रँडमास्टर होण्याचा पराक्रम केला. त्याने ही कामगिरी केली त्यावेळी त्याचे वय १२ वर्षे चार महिने आणि २५ दिवस होते. त्याने सर्जेई कार्याकिनचा १२ वर्षे ७ महिन्यांचा विक्रम मोडला.

मुंबई - अनिवासी भारतीय असलेल्या अभिमन्यू मिश्राने जगातील सर्वात लहान ग्रँडमास्टर होण्याचा पराक्रम केला. त्याने ही कामगिरी केली त्यावेळी त्याचे वय १२ वर्षे चार महिने आणि २५ दिवस होते. त्याने सर्जेई कार्याकिनचा १२ वर्षे ७ महिन्यांचा विक्रम मोडला.

न्यू जर्सीच्या असलेल्या अभिमन्यूने बुडापेस्ट येथील वेझेरकेप्झो ग्रँडमास्टर मिस्क स्पर्धेत विजेतेपद जिंकत तिसरा आणि अखेरचा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. त्याने अखेरच्या फेरीत भारताच्या लिऑन मेंडोका याला हरवून आवश्यक असलेले या स्पर्धेतील सात गुण मिळवले. त्याने हे सर्व नॉर्म बुडापेस्ट स्पर्धेत मिळवले आणि तेही तीन महिन्यांत. 

सात वर्षांचा असल्यापासून अभिमन्यू अमेरिकेतील बुद्धिबळात धक्कादायक कामगिरी करीत आहे. त्याने नऊ वर्षांचा असतानाच अमेरिकेतील सर्वात लहान नॅशनल मास्टर आणि १० वर्षे नऊ महिने २० दिवस वय असताना सर्वात लहान आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान मिळवला. अभिमन्यूच्या आई-वडिलांना आता सर्वात लहान वयात ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम खुणावत होता. त्यासाठी त्यांनी निधी उभारला आणि बुडापेस्टला रवाना झाला.

बुडापेस्टमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय तसेच ग्रँडमास्टरचा सहभाग असलेल्या स्पर्धा होत असतात. त्याने एप्रिलमध्ये पहिला, मेच्या सुरुवातीस दुसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. त्याने ब्रेक न घेता खेळत २५०० नॉर्मचा टप्पाही पार केला आहे. दोन स्पर्धांत तिसरा नॉर्म हुकल्यावर आता त्याने एक फेरी शिल्लक ठेवूनच नॉर्मसाठी आवश्यक असलेले सात गुण मिळवले. त्याला एस अर्जुन प्रसाद आणि पी. मंगेश चंद्रन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

सर्वात लहान ग्रँडमास्टर
१) अभिमन्यू मिश्रा (अमेरिका) १२ वर्षे ४ महिने २५ दिवस
२) सर्गी कार्याकिन (युक्रेन) १२ वर्षे ७ महिने 
३) गुकेश दोम्माराजू (भारत) १२ वर्षे ७ महिने १७ दिवस
४) जावोखिर सिंदोरोव (उझबेकिस्तान) १२ वर्षे, १० महिने ५ दिवस
५) प्रग्नानंधा रमेशबाबू (भारत) १२ वर्षे १० महिने १३ दिवस
६) नॉदिर्बेक आब्दुसात्तोरोव (उझबेकिस्तान) १३ वर्षे १ महिना ११ दिवस
७) परिमार्जन नेगी (भारत) १३ वर्षे ४ महिना २२ दिवस
८) मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) १३ वर्षे ४ महिने २७ दिवस
९) वेई यि (चीन) १३ वर्षे ८ महिने २३ दिवस
१०) रौनक साधवानी (भारत) १३ वर्षे ९ महिने २८ दिवस

गुकेश दुर्दैवी
खरं तर सर्वात लहान वयात ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम गुकेश करेल असेच वाटत होते. पण आता पंधरा वर्षांचा असलेला गुकेश कार्याकिनचा विक्रम मोडण्यापासून १७ दिवस दूर राहिला होता. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय मास्टर होताना अभिमन्यूने भारताच्या आर प्रग्नानंधा याचा विक्रम मोडला होता.


​ ​

संबंधित बातम्या