अल्फियाचे ऐतिहासिक सुवर्ण

पीटीआय
Saturday, 24 April 2021

नागपूरच्या अल्फिया पठाणने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील पहिली महाराष्ट्राची सुवर्णपदक विजेती महिला होण्याचा मान मिळवला.

मुंबई - नागपूरच्या अल्फिया पठाणने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील पहिली महाराष्ट्राची सुवर्णपदक विजेती महिला होण्याचा मान मिळवला. 

तीन वर्षांपूर्वी अकोल्याच्या साक्षी गायधने हिने या स्पर्धेत ब्राँझ जिंकले होते; पण त्यापेक्षा सरस कामगिरी अल्फियाने केली आहे, असे तिचे मार्गदर्शक श्री गणेश पुरोहित म्हणाले.  

अल्फियाचा भाऊ माझ्याकडे बॉक्सिंगचे धडे गिरवत होता. त्या वेळी अल्फिया फिटनेससाठी बॅडमिंटन खेळत होती. एकदा सहज गप्पा मारताना तिला बॉक्सिंग खेळणार का, असे विचारले, तर तिने त्यात काय, फक्त ठोसे द्यायचे असतात आणि खायचे असतात, अशी टिप्पणी केली. त्यावर मी तिला मग खेळत का नाहीस, असे विचारल्यावर तिने वडिलांना याबाबत विचारले. त्यांनी त्यास नकार दिला; पण मी त्यांना तयार केले. त्या वेळी ती चौदा वर्षांची होती. तिचे वजन जास्त असल्याने तिला राज्य सतरा वर्षांखालील स्पर्धेत खेळवण्याचे ठरवले. लातूरची ही स्पर्धा जिंकल्यामुळे तिला प्रसिद्धी लाभली. घरूनही प्रोत्साहन मिळाले आणि त्यानंतर तिने स्पर्धा जिंकत जोरदार प्रगती केली आहे, असेही पुरोहित यांनी सांगितले.

सुवर्णपदकाचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. कठोर परिश्रमास यश मिळाले आहे. विजेतेपदाबरोबरच अंतिम सामन्यातील ५-० विजयही सुखावत आहे. या स्पर्धेत खूप चागली कामगिरी करून बाजी मारली, हेही समाधान देत आहे.
- अल्फिया पठाण


​ ​

संबंधित बातम्या