मसल पॉवर रसेलने मानले PM मोदींचे आभार; जाणून घ्या त्यामागचे कारण

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 March 2021

भारत आणि जमेका आता बंधुत्वाचे नाते निर्माण झाले आहे, असा उल्लेखही आंद्रे रसेलनं केलाय.   

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटर आंद्रे रसेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यासाठी त्याने सोशल मीडियावरुन एक खास व्हिडिओ शेअर केलाय. जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाला मात करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या देशात भारताचा समावेश होता. भारताकडून जमेकाला लशीचे डोस पुरवण्यात आले आहेत. यासंदर्भातच आंद्रे रसेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय उच्चायुक्तांचे आभार मानले. ट्विटरवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रसेलने म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय उच्चायुक्तालयाचा मी खूप खूप आभारी आहे. जमेकामध्ये लस उपलब्ध झाल्यामुळे आम्ही उत्साहित झालो आहोत. याठिकाणी आता आम्हाला सुरक्षित वाटते. जमेकामध्ये लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल याठिकाणचे लोक भारताचे ऋणी राहतील. भारत आणि जमेका आता बंधुत्वाचे नाते निर्माण झाले आहे, असा उल्लेखही आंद्रे रसेलनं केलाय.   

विराट भावा, तुझं नेमकं चाललंय तरी काय?

मार्च महिन्याच्या सुरुवातीला भारताने 50 हजार कोविड डोसची पहिली खेप जमेकाला पाठवली आहे. यापूर्वी जमेकाचे पंतप्रधान  अँड्रयू होलनेस यांनी भारताचे आभार मानले होते. जमेकाच्या पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की,  भारत सरकारकडून  एस्ट्राजेनेका व्हॅक्सिनच्या 50,000 डोसची पहली खेप मिळाली. या सहकार्याबद्दल देशवासिय भारत सरकारचे आभारी आहेत. 8 मार्चला मेड इन इंडिया लस जमेकात पोहचली आहे.  

 जमेकन आंद्रे रसेल आपल्या स्फोटक फलंदाजीसह मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देत प्रतिस्पर्धी संघाला गोत्यात आणण्यात तरबेज आहे. तो वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघातून खेळत असला तरी आयपीएलमध्ये तो नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना दिसते. त्याच्या स्फोटक खेळीचे अनेक फॅन भारतातही आहेत. आयपीएलमधील 74 सामन्यातील 61 डावात त्याने 1517 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीशिवाय गोलंदाजीमध्येही त्याने विशेष छाप सोडली आहे. 68 डावात त्याच्या खात्यात 61 विकेट आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 74 सामन्यात त्याने चौकारापेक्षा अधिक षटकार खेचले आहेत. आयपीएलमध्ये 105 चौकार खेचणाऱ्या रसेलच्या नावे 129 षटकारांची नोंद आहे. गगनचुंबी आणि डोळ्याचे पारणे फेडण्याच्या फटकेबाजीमुळे रसेलला मसल पॉवर खेळाडू म्हणूनही ओळखले जाते. 


​ ​

संबंधित बातम्या