बॉक्‍सिंग जगज्जेतेपद अँथनी जोशुआने राखले 

संजय घारपुरे
Monday, 14 December 2020

दोन वर्षांपूर्वी जोशुआला अँडी रुईझविरुद्ध धक्कादायक हार पत्करावी लागली होती, पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी जोशुआने सुरुवातीपासून घेतली.

लंडन:  अँथनी जोशुआ याने बॉक्‍सिंग हेवीवेट गटातील विजेतेपद राखले. त्याने ही कामगिरी करताना बल्गेरियाच्या कोब्रात पुलेव याला नॉकआऊट केले. या यशानंतर त्याने टायसन फरी याला आव्हान दिले. वेम्बले एरिना येथे एक हजार चाहत्यांच्या उपस्थितीत जोशुआने प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही.

दोन वर्षांपूर्वी जोशुआला अँडी रुईझविरुद्ध धक्कादायक हार पत्करावी लागली होती, पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी जोशुआने सुरुवातीपासून घेतली. त्याने या लढतीनंतर मी कोणाशीही लढण्यास तयार आहे, असे सांगितले. त्याचबरोबर जोशुआ - टायसन लढत कोणाला बघायची आहे, अशी जाहीर विचारणाही केली. 

डब्लूबीसी विजेत्यास हरवण्याचे माझे 2013 पासूनचे स्वप्न आहे. आता यासाठी टायसनला हरवण्याची आवश्‍यकता असेल तर त्या आव्हानासाठी मी तयार आहे, असे जोशुआने सांगितले. जोशुआ-टायसन लढत नव्या वर्षाचे आकर्षण असेल, असे मानले जात आहे. 

नॉकआऊटनंतरही लढत कायम 

पुलेव गेल्या सहा वर्षांत फक्त एका लढतीत पराजित झाला होता, पण जोशुआला त्याला तीन फेऱ्यातच नॉकआऊट करण्याची संधी होती. त्यापूर्वी पुलेव दोनदा काऊंटबॅकला सामोरा गेला होता. जोशुआच्या ताकदवान ठोशांनी बेजार झालेल्या पुलेवने स्वतःला रिंगच्या रोपवर झोकून दिले होते. मात्र त्यानंतरही जोशुआने त्याला खेळण्याची संधी दिली. नवव्या फेरीत जोशुआच्या ताकदवान ठोशांनी पुलेव खाली पडला आणि तो उभाच राहू शकला नाही. काही वेळातच पुलेवने हार मान्य केली.  
 


​ ​

संबंधित बातम्या