पती-पत्नी उपउपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 July 2021

भारतीय तिरंदाज कमालीच्या दडपणाखाली एकाग्रता साधू शकतात हे दाखवून देताना अतानू दासने माजी विजेत्याचा ऑलिंपिक तिरंदाजी स्पर्धेत पाडाव केला आणि पत्नी दीपिका कुमारीप्रमाणेच उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

टोकियो/ मुंबई - भारतीय तिरंदाज कमालीच्या दडपणाखाली एकाग्रता साधू शकतात हे दाखवून देताना अतानू दासने माजी विजेत्याचा ऑलिंपिक तिरंदाजी स्पर्धेत पाडाव केला आणि पत्नी दीपिका कुमारीप्रमाणेच उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अतानूचा कोरियाच्या ओ जिन - ह्येक याच्याविरुद्धचा विजय भारताच्या पदकाच्या आशा उंचावणारा आहे.

लंडन ऑलिंपिक विजेत्या ओ याचा यंदाच्या स्पर्धेत पुरुष सांघिक सुवर्णपदक जिंकलेल्या कोरिया संघात समावेश होता. तिरंदाजीचे कोरियातील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याचा बहुमान त्याने मिळविला आहे. या स्पर्धेत त्याने तिसरे मानांकन मिळविले होते, तर अतानू ३५ वा होता. यंदाच्या मानांकन फेरीत आघाडीच्या चार तिरंदाजांत तीन कोरियन होते, त्या मक्तेदारीस आव्हान दिलेल्या ब्रॅडी एलिसनने प्रवीण जाधवचा पाडाव केला आहे. अतानूने विजयाचे श्रेय दीपिकाला दिले. ती सतत मला तू शांतपणे लक्ष्यवेध केलास तर विजय अवघड नाही हेच सांगत होती. तिचा माझ्या क्षमतेवर विश्वास होता, त्यामुळेच मी जिंकू शकलो असे तो म्हणाला.

अतानूने ओ याला ६-५ (२५-२६, २७-२७, २७-२७, २७-२२, २८-२८, १०-९) असे हरवले. अतानूने २०१९ च्या आशियाई स्पर्धेत ओ याला शूटऑफवर ६-५ असे हरवून ब्राँझ जिंकले होते. दरम्यान अतानूने त्यापूर्वीच्या फेरीत तैवानच्या यू चेऊंग देंग याला  ६-४ (२७-२६, २७-२८, २८-२६, २७-२८, २८-२६) असे पराजित केले होते.

पहिला सेट अतानूने एकाच गुणाने  जिंकला आणि दुसरा तसेच तिसरा सेट बरोबरीत सोडवला, त्या वेळी कदाचित अनपेक्षित निकालाची भेट मिळू शकेल अशी आशा निर्माण झाली. अतानूच्या प्रतिकारामुळे कदाचित असेल, पण चौथ्या सेटमध्ये ओ याच्याकडून ६ आणि ७ गुणांची नोंद झाली. ते अतानूच्या पथ्यावर पडले. पाचवा सेटही बरोबरीत सुटल्याने शूटऑफ निर्णायक ठरला. त्यात ओ नऊ गुणांचा वेध घेत असताना अतानूने १० गुणांची अचूकता साधली. अतानूसमोर आता जपानच्या ताकाहारू फुरुकावा याचे आव्हान असेल. मानांकन क्रमवारीत तो अतानूच्या मागे होता.

शूटऑफच्या वेळी नक्कीच तणाव होता. तो पहिले शूट करणार होता. त्याने नऊचा वेध घेतला तर मी जिंकू शकेन हा मला विश्वास होता, पण विजय हवा की पराभव हाही प्रश्न होता. संपूर्ण सामन्याच्या वेळी मी फार दूरचा विचार न करता लक्ष्याचाच विचार केला. तेच शूटऑफमध्ये केले.
- अतानू दास


​ ​

संबंधित बातम्या