अतानू दास, दीपिकाचा विश्वकरंडकात सुवर्णवेध

पीटीआय
Tuesday, 27 April 2021

अतानू दास आणि दीपिका कुमारी यांनी विवाहानंतरच्या पहिल्याच विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

विवाहानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत सोनेरी कामगिरी, भारतास तीन सुवर्णपदके
मुंबई - अतानू दास आणि दीपिका कुमारी यांनी विवाहानंतरच्या पहिल्याच विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. ग्वाटेमालातील स्पर्धेत या दोघांना मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती, पण त्याची भरपाई त्यांनी वैयक्तिक स्पर्धेतील सुवर्णवेध घेऊन केली.

स्वप्न प्रत्यक्षात आल्याचीच भावना आहे. गेली काही वर्षे या सुवर्णपदकाचे स्वप्न बाळगले होते. ते आता साध्य झाले आहे, असे अतानूने सांगितले. त्याने पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेत बाजी मारली. दीपिकाने तिसरे विश्वकरंडक सुवर्णपदक जिंकले. दीर्घ कालावधीनंतर अंतिम फेरीची लढत खेळत होते. या यशाचा आनंद आहे तसेच काहीशी नर्व्हसही आहे. या यशामुळे आगामी स्पर्धेत जास्त चमकदार कामगिरी करण्यास मी प्रेरितही झाले आहे असे तिने सांगितले. भारताने या स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली.

गतवर्षी जूनमध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर अतानूने आम्ही प्रवास, सराव एकमेकांसह करतो आणि स्पर्धा सहभागी होतो तसेच एकाच वेळी जिंकतोही, असे सांगितले होते. तेच ग्वाटेमालात घडले. पात्रतेत तिसरी आलेली दीपिका अखेरच्या दिवशी आव्हान कायम असलेल्यांत सर्वोत्तम मानांकन असलेली होती. 

उपांत्य फेरीत तिने मेक्सिकोच्या अॅलेजांद्रा व्हॅलेन्सिया हिला हरवले. याच अॅलेजांद्राने अंकिता भकतचे आव्हान संपवले होते. अंतिम फेरीत दीपिकाने सुरुवातीची ३-१ आघाडी गमावली. शूटऑफवर दीपिकाने नऊ गुणांचा वेध घेतला. तिचा वेध १० गुणांपासून थोडाच दूर होता. 

प्रतिस्पर्धीचा नऊ गुणांचा वेध जास्त दूर असल्याने दीपिकाची सरशी झाली. अंतिम फेरीच्या वेळी हृदयातील धडधड वाढली होती. त्याकडे दुर्लक्ष करणेच जास्त अवघड होते, असे दीपिकाने सांगितले.

अतानूचा अंतिम फेरीतील विजय जास्त सफाईदार होता. त्याने स्पेनच्या डॅनियल क्रॅस्टोविरुद्ध सुरुवातीपासून हुकुमत राखली आणि क्रॅस्टोचे लक्ष्य साध्य होण्यापूर्वीच त्याचे सुवर्णपदक निश्चित झाले होते. ऑलिंपिक वर्षात सुवर्णपदक जिंकल्यामुळे जास्त खूश आहे, असे अतानूने सांगितले. अतानू तसेच अंकिता भकतने मिश्र दुहेरीत ब्राँझ जिंकताना मेक्सिकोच्या जोडीस ६-२ असे पराजित केले.


​ ​

संबंधित बातम्या