ॲथलेटिक्स स्पर्धा शर्यती आजपासून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 July 2021

टोकियोच्या दमट हवामानात या स्पर्धा होत आहेत. त्यातच प्रेक्षकांची अनुपस्थिती राहणार असल्याने ॲथलिट्‍सच्या कामगिरीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रचंड उकाडा व दमटपणामुळे मॅरेथॉन शर्यत टोकियोमध्ये न घेता तुलनात्मकदृष्ट्या थंड असलेल्या सोपोरो येथे होत आहे.

टोकियो - सर्व खेळांचा आत्मा असलेल्या आणि ऑलिंपिकमध्ये प्रमुख आकर्षण असलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धा शर्यतींना प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत उद्यापासून सुरुवात होत आहे. भारताच्या पहिल्या पदकाची उत्सुकता, पुरुषांत नवीन वेगवान धावपटू, मध्यम व लांब पल्ल्याच्या शर्यतीत केनिया, इथिओपियापुढे युगांडाचे आव्हान, १०० मीटर शर्यतीत तिसऱ्या सुवर्णपदकाचा दावा करणारी जमैकाची शेली ॲन फ्रेझर आणि नेदरलँडच्या सिफान हसनचा तीन सुवर्णपदकांचा प्रयत्न अशा अनेक घटनांनी यंदाच्या ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स स्पर्धा स्मरणात राहील.

टोकियोच्या दमट हवामानात या स्पर्धा होत आहेत. त्यातच प्रेक्षकांची अनुपस्थिती राहणार असल्याने ॲथलिट्‍सच्या कामगिरीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रचंड उकाडा व दमटपणामुळे मॅरेथॉन शर्यत टोकियोमध्ये न घेता तुलनात्मकदृष्ट्या थंड असलेल्या सोपोरो येथे होत आहे. तरीही धावपटूंचा त्यात कस लागणार आहे. ट्रॅकवरील शर्यतीत विशेषतः उसेन बोल्टचा अध्याय संपल्यानंतर वेगवान धावपटूसाठी अमेरिकेच्या ख्रिस्तियन कोलमनकडे त्याचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते; मात्र त्याच्यावर बंदी आल्याने आता अमेरिकेचाच ट्रायवोन ब्रोमेल प्रबळ दावेदार आहे; मात्र त्याच्यापुढे देशवासी रोनी बेकर, दक्षिण आफ्रिकेचा अकानी सिंबाने, कॅनडाचा आंद्रे ग्रासी यांचे आव्हान आहे. या शर्यतीत यंदा जमैकाचे आव्हान कमकुवत आहे.

डोपिंगचं भूत
डोपिंगचं भूत प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर कायम असते. त्यात महिला धावपटूंमध्ये पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढण्याचे प्रकार सुरू झाल्यापासून जागतिक ॲथलेटिक्सची चिंता वाढली आहे. यंदा डोपिंगच्या संशयामुळे १६ देशांतील ३१ पात्र ॲथलिट्‍सची कामगिरी व पाच रिले संघांची कामगिरी चौकशीच्या रडारवर आहे. हार्मोन्स निर्धारित प्रमाणाबाहेर वाढल्याने चारशे मीटर शर्यतीत विश्वविक्रम मोडीत काढणाऱ्या नामेबियाच्या १८ वर्षीय ख्रिस्तीन म्बोमा व बॅट्रीस मसिलिंगी यांनी फक्त दोनशे मीटर शर्यतीत भाग घेण्याचे निश्चित केले आहे.

नीरजच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे
भारतीय क्रीडाप्रेमी ॲथलेटिक्समधील पहिल्या पदकाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या अपेक्षांचे ओझे साहजिकच भालाफेकपटू नीरज चोप्राच्या खांद्यावर आहे. जागतिक ज्युनिअर, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या नीरजची सध्या पाच दिग्गज भालाफेकपटूंत गणना होते. त्यामुळेच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करण्यात येत आहे; मात्र नीरजसाठी पदकाचा मार्ग सोपा नाही. त्याच्या मार्गात जर्मनीचा जोहानन्स वेट्टर, त्रिनिदादचा केशॉर्न वॉलकॉट, केनियाचा ज्युलियस वेगो, ग्रेनेडाचा पीटर अँडरसन, लॅटव्हियाचा गॅटीस कॅकस, पोलंडचा मार्सीन क्रुकोव्हस्की यांचे आव्हान आहे. ८८.०७ मीटर ही नीरजची सर्वोत्तम कामगिरी असून पदक जिंकण्यासाठी त्याला यापेक्षा अधिक फेक करावी लागेल असे चित्र आहे.

याशिवाय अविनाश साबळेकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. २०१८ मध्ये भुवनेश्वर येथे सर्वप्रथम राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर अविनाशने त्यात पाच वेळा सुधारणा केली आहे. स्टीपलचेस शर्यतीत केनिया, इथिओपियाचे वर्चस्व असल्याने अविनाशकडून पदकाची अपेक्षा नाही; मात्र अंतिम फेरी गाठून किमान पहिल्या आठ स्पर्धकांत स्थान मिळवण्याची त्याची नक्कीच क्षमता आहे.


​ ​

संबंधित बातम्या