एका पाँइटमुळे आयुष्याचा शेवट; गीता- बबीता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 18 March 2021

रितिका फोगाट हिने देखील गीता आणि बबीताप्रमाणे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या महावीर सिंह फोगाट यांच्या मार्गदर्शनाखालीच कुस्तीची अनेक मैदाने गाजवली होती. 

महिला कुस्तीपटू रितिका फोगाट हिने आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमध्ये झालेल्या स्पर्धेतील पराभवानंतर तिने हे टोकाचे पाउल उचलल्याचे बोलले जात आहे.  14 मार्च रोजी भरतपूर येथील एका कुस्ती स्पर्धेतील फायनल सामना झाला. या लढतीत रितिकाला एका पॉइंट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे. रितिका फोगाट प्रसिद्ध महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि बबीता फोगाट यांच्या मामाची मुलगी होती. रितिका फोगाट हिने देखील गीता आणि बबीताप्रमाणे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या महावीर सिंह फोगाट यांच्या मार्गदर्शनाखालीच कुस्तीची अनेक मैदाने गाजवली होती. 

बबीता फोगाटने बहिणीच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. " परमेश्वर रितिकाच्या आत्म्याला शांती लाभो! हा प्रसंग फोगाट कुटुंबियांसाठी अत्यंत दुखद आहे. कोणत्याही समस्येला आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. विजय आणि पराभव या आयुष्यातील दोन महत्वपूर्ण पैलू आहेत.  संघर्ष हीच यशाचे गुरुकील्ली असते. संघर्षाला घाबरुन असे पाउल कोणीही उचलू नये, असा संदेश बबीताने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलाय. रितु फोगाट हिने देखील रितिकाच्या आत्महत्येनंतर ट्विटरच्या माध्यमातून दुख व्यक्त केले आहे. तिने ट्विटमध्ये लिहिलंय की छोटी बहिण रितिकाच्या आत्म्याला शांती लाभो! मला अजूनही ही घटना सत्य वाटत नाही. तुझी उणीव नेहमी भासेल. तिने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलंय की, फोगाट कुटुंबिय अतिशय वाईट प्रसंगाला सामोरे जात असून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरु नये, असे आवाहन तिने केले आहे. 

रितिका फोगाट अवघ्या 17 वर्षांची होती. तिचा जन्म राजस्थानमधील झुंझुनू येथे  25 मार्च 2004 मध्ये झाला.  रीतिका फोगाट ही देखील गीता-बबीताप्रमाणे प्रसिद्ध कुस्तीपटू होण्याचे स्वप्न बाळगून होती. रितिका मागील पाच वर्षांपासून महावीर फोगाट यांच्या अकादमीत ट्रेनिंग घेत होती. एका लढतीतील पराभवाला खचून तिने टोकाचे पाउल उचलले. 14 मार्च रोजी झालेल्या तिच्या लढतीवेळी महावीर फोगाट देखील उपस्थितीत होते.


​ ​

संबंधित बातम्या