लढवय्यी भवानी देवी पराजित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या तलवारबाजी प्रकारातील ऐतिहासिक पात्रता, तसेच सलामीची लढत जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरलेली भवानी देवी संघर्षपूर्ण सुरुवात केल्यानंतर पराजित झाली.

टोकियो / मुंबई - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या तलवारबाजी प्रकारातील ऐतिहासिक पात्रता, तसेच सलामीची लढत जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरलेली भवानी देवी संघर्षपूर्ण सुरुवात केल्यानंतर पराजित झाली.

तलवारबाजीच्या वैयक्तिक सेबर प्रकारातील दुसऱ्या फेरीच्या लढतीत भवानी चौथ्या मानांकित मॅनन ब्रुनेट हिच्याविरुद्ध ७-१५ अशी पराजित झाली. त्यापूर्वी तिने विजयी सलामी देताना ट्युनिशियाच्या नादिया बेन अझिझी हिला १५-३ असे पराजित केले होते. दुसऱ्या फेरीच्या लढतीत सुरुवातीस चुका टाळल्या असत्या तर कदाचित वेगळा निकाल लागला असता, अशी खंत भवानीने व्यक्त केली.

सुरुवातीस प्रतिकाराची संधी असताना चुका झाल्या. दुसऱ्या सत्रात भिन्न प्रकारे आक्रमण केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता, चांगल्या प्रतिस्पर्ध्यांसमोर कडवे आव्हान निर्माण केले याचे समाधान आहे. त्यातून मी नक्कीच शिकणार आहे. प्रथमच भारतीय स्पर्धक या स्पर्धेत खेळला, याचा मला आनंद आहे, असे तिने सांगितले.

तलवारबाजीमधील सेबर हा सर्वात वेगवान प्रकार आहे. त्यात स्पर्धकास कमरेच्यावरच वार करून गुण मिळतात. प्रथम गुण मिळविणारा स्पर्धक विजेता होतो. रिओतील पात्रता हुकल्यानंतर मी जास्त कणखर झाले होते. आता या स्पर्धेने मला जास्त आव्हान करण्याची प्रेरणा दिली आहे, असे तिने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या