लोवलिनाच्या प्रयत्नांस ब्राँझचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 August 2021

लोवलिना बार्गोहेन हिचे ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. तिला जागतिक विजेती बुसेनाझ सुरमेनेली हिच्याविरुद्धच्या उपांत्य लढतीत पराभव स्वीकारावा लागला आणि तिला ब्राँझ पदकावरच समाधान मानावे लागले.

टोकियो / मुंबई - लोवलिना बार्गोहेन हिचे ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. तिला जागतिक विजेती बुसेनाझ सुरमेनेली हिच्याविरुद्धच्या उपांत्य लढतीत पराभव स्वीकारावा लागला आणि तिला ब्राँझ पदकावरच समाधान मानावे लागले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या लोवलिनाने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या असलेल्या तैवानच्या चेन निएन चीन हिला ४-१ असे हरविले होते; पण ती जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बुसेनाझला फारसे आव्हान देऊ शकली नाही. बुसेनाझने या स्पर्धेतील यापूर्वीच्या दोन्ही लढतीत ५-० कौल मिळविला होता. याच निकालाची पुनरावृत्ती तिने लोवलिनाविरुद्धच्या लढतीतही केली.

ती या सामन्यात २६-३०, २६-३०, २५-३०, २५-३०, २५-३० अशी पराजित झाल्याचा कौल पंचांनी दिला.

लोवलिनाला पहिल्या फेरीपासून बचाव करणे भाग पडले. बुसेनाझचे ठोसे ताकदवान होते; तसेच अचूकही होते. तिचा खेळ जास्त सफाईदार होता. प्रतिस्पर्ध्याला खच्ची करण्यासाठी त्याच्या डोक्यावर तसेच चेहऱ्यावर ठोसे देण्याची गरज असते, बुसेनाझने नेमके हेच केले. लोवलिनाची प्रतिस्पर्धीच्या जास्त जवळ जात तिला आक्रमणापासून रोखण्याची लोवलिनाची चाल फारशी यशस्वी ठरली नाही. तिला स्टँडिंग काउंटलाही सामोरे जावे लागले. त्याचबरोबर रेफरींनी लढत थांबविल्यावरही ठोसे दिल्यामुळे ताकीद देण्यात आली; तसेच एका गुणाचा दंडही करण्यात आला.

लोवलिनाने दुसऱ्या फेरीपासून काही चांगले बॉडी शॉट्स दिले तसेच तिचे राईट हूकही प्रभावी होते; पण बुसेनाझच्या ताकदवान ठोशांनी तिला थकविले होते. पहिल्या दोन्ही फेऱ्या ०-५ ने गमाविल्यामुळे लोवलिनास तिसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धीस नॉकआउट करण्याचा पर्याय होता. त्यासाठी आक्रमक सुरवात केली खरी; पण तो जोष ती राखू शकली नाही.

बॉक्सिंगमधील तिसरे ब्राँझ
लोवलिनाने ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारताचे तिसरे ब्राँझ जिंकले. यापूर्वी विजेंदर सिंग (२००८ बीजिंग) आणि मेरी कोम (२०१२ लंडन) यांनी ही कामगिरी केली होती.

सलग तिसरा धक्का देण्यात अपयश
लोवलिनासाठी स्पर्धेचा ड्रॉ खूपच खडतर होता. तिला सलामीला जागतिक स्पर्धेत दोनदा पदक जिंकलेल्या नादिन अॅपेत्झ हिचा सामना करावा लागला. त्यानंतरची तिची प्रतिस्पर्धी असलेली चेन ही माजी जागतिक विजेती होती. या दोन्ही लढती तिने जिंकल्या; पण जागतिक तसेच ऑलिंपिक विजेतीस हरविण्यात ती कमी पडली.


​ ​

संबंधित बातम्या