भारताच्या जलतरणपटूची जागतिक महासंघाकडे तक्रार

पीटीआय
Friday, 23 April 2021

आपल्या जलतरणपटूंनी ऑलिंपिक पात्रता वेळ साध्य करावी यासाठी उझबेकिस्तान जलतरण स्पर्धा संयोजकांनी अधिकृत वेळेत फेरफार केले, असा आरोप भारताचा जलतरणपटू लिखित सेल्वराज याने केला आहे.

नवी दिल्ली - आपल्या जलतरणपटूंनी ऑलिंपिक पात्रता वेळ साध्य करावी यासाठी उझबेकिस्तान जलतरण स्पर्धा संयोजकांनी अधिकृत वेळेत फेरफार केले, असा आरोप भारताचा जलतरणपटू लिखित सेल्वराज याने केला आहे.

सेल्वराजने जागतिक जलतरण महासंघाकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. एवढेच नव्हे, तर याबाबत आक्षेप घेतल्यावर आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला, असाही आरोप त्याने केला आहे. उझबेकिस्तान जलतरणपटूंच्या नावावर ऑलिंपिक पात्रता वेळेची नोंद होण्यासाठी खूप फेरफार करण्यात आले, त्यामुळे भारतीय स्पर्धकांचीही वेळ बदलली, असा आरोप त्याने केला. तो १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत १ मिनीट १.७२ सेकंद या ऑलिंपिक ब पात्रता वेळेपासून थोडक्यात दूर राहिला. 

त्याने १०० मीटर फ्रीस्टाईल तसेच १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीतील प्राथमिक फेऱ्यांतील स्पर्धकांची वेळ तपासण्याची सूचना करताना त्या शर्यतींचा व्हिडीओही अपलोड केला आहे. उझबेकिस्तानच्या अॅलेक्सी तॅरासेंको याने १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीच्या प्राथमिक फेरीत ५१ सेकंद वेळ दिली होती, पण त्याची नोंद ४८.५५ सेकंद करण्यात आली. ज्याद्वारे तो ऑलिंपिकसाठी पात्र ठरला. ही कामगिरी फलकावर दिसली नव्हती याकडेही त्याने लक्ष वेधले.माझी अखेरच्या दिवशी २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यत होती. वेळेत होणारा फेरफार पाहून मी स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले. शर्यत सुरू करण्याची खूण झाल्यावर मी उडी मारली नाही. काही वेळाने पाण्यात उतरलो. माझे टचपॅड बंद केले आणि पंचांना मी जागतिक विक्रम केल्याचे सांगितले.

अखेरच्या दिवशी झालेल्या १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीच्या प्राथमिक फेरीतील भारतीयांची वेळच जाहीर करण्यात आली नाही. या शर्यतीत साजन प्रकाश अव्वल आल्याचे दिसते. त्याची वेळ आम्ही नोंदवल्यानुसार ५४ सेकंद होती; मात्र निकाल जाहीर झाला त्या वेळी अव्वल आलेल्या उझ्बेक स्पर्धकाची वेळ ५२.०२ सेकंद होती; तर साजनची ५२.७४. कर्नाटक स्पर्धेत आदित्यने ५६.४३ वेळ दिली होती; तर उझबेकिस्तानच्या स्पर्धेत त्याची वेळ झाली ५३.४५ सेकंद.
- लिखित सेल्वराज, भारतीय जलतरणपटू


​ ​

संबंधित बातम्या