दीपिकाचा वेध पदकाच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

टोकियो परिसरात घोंघावत असलेल्या वादळाचे आव्हान पेलत दीपिका कुमारीने ऑलिंपिक तिरंदाजीच्या वैयक्तिक स्पर्धेतील पदकाच्या आशा कायम ठेवल्या. प्रवीण जाधवचे लक्ष्य वाऱ्यामुळे दुरावत असताना दीपिकाने अनुभव पणास लावत भारताचे आव्हान कायम ठेवले.

टोकियो / मुंबई - टोकियो परिसरात घोंघावत असलेल्या वादळाचे आव्हान पेलत दीपिका कुमारीने ऑलिंपिक तिरंदाजीच्या वैयक्तिक स्पर्धेतील पदकाच्या आशा कायम ठेवल्या. प्रवीण जाधवचे लक्ष्य वाऱ्यामुळे दुरावत असताना दीपिकाने अनुभव पणास लावत भारताचे आव्हान कायम ठेवले. दरम्यान, पुरुष एकेरीतील मोहीम अतानू दास उद्यापासून सुरू करणार आहे. 

दीपिकाने दुसऱ्या फेरीच्या प्रकाशझोतातील लढतीस अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिस हिला ६-४ (२५-२६, २८-२५, २७-२५, २४-२५, २६-२५) असे पराजित केले. दीपिकाने या लढतीत तीनदा दहा, सात वेळा नऊ गुणांचा वेध घेतला. तिला तीन वेळचा आठ, तसेच सात आणि सहाचा प्रत्येकी एक प्रयत्न सलत असेल. अर्थात याचा कामगिरीवर परिणाम होणार याची तिने काळजी घेतली. हे सहा गुण नोंदले गेलेले दोन्ही सेट तिने गमाविले. अर्थात तिला जेनिफरच्या तीन सात तसेच सहा आठ गुणांचा वेध पथ्यावर पडला. सलामीच्या फेरीत दीपिकाने भूतानच्या कर्मा हिला ६-० (२६-२३, २६-२३, २७-२४) असे हरवले होते. 

सामन्याला सात गुणांनी सुरवात होऊनही दीपिका फारशी डगमगली नाही. दुसऱ्या सेटमध्येही पहिला तीर ८ गुणांचाच होता, पण त्यानंतर तिने अचूकता साधली. तिसऱ्या सेटला अचूक दहा गुणांनी सुरुवात करीत प्रतिस्पर्धीवर दडपण आणले. चौथ्या सेटच्या दुसऱ्या प्रयत्नातील सहा गुणांनी आव्हान अवघड केले. पण पाचव्या सेटमध्ये सुरुवातीच्या दोन्ही प्रयत्नात दीपिकाने ९ गुण मिळविल्यावर प्रतिस्पर्धी कोलमडली, त्यामुळे अखेरच्या प्रयत्नात ८ गुण मिळाल्याचाही फटका बसला नाही. अर्थात सामन्यातील बरोबरीसाठी जेनिफरला अखेरच्या प्रयत्नात दहा गुण हवे होते, तिला आठच गुण मिळविता आले. 

तरुणदीप रायने युक्रेनच्या हुनबिन ऑलेक्सि याला ६-० हरवून विजयी सलामी दिली, पण तो इस्राएलच्या शॅनी इती याच्याविरुद्ध ५-६ असा पराजित झाला. त्याने सुरुवातीच्या पिछाडीनंतर ५-३ आघाडी घेतली. अखेरचा सेट गमाविला नसता तर त्याने आगेकूच केली असती, पण हा सेट तसेच त्यानंतरचे शूटऑफ त्याने एका गुणाने गमाविले. 

सुरुवातीस वाऱ्याच्या वेगाचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे कदाचित जास्तीचे प्रयत्न करीत होते. गेल्या ऑलिंपिकमधील अपयशामुळे या वेळी सुरवातीच्या फेऱ्यात जास्तीचे दडपण होते. गेल्या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत पराजित झाले होते. आता या फेरीत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेन.
- दीपिका कुमारी

चमकदार विजयानंतर जाधवची हार
ऑलिंपिक पदार्पण करणाऱ्या प्रवीण जाधवने सलामीला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या असलेल्या गॅल्सान बॅझार्झापोव याला पराजित केले, पण त्यानंतर त्याला जागतिक विजेत्या ब्रॅडी एलीसन याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.  प्रवीणने सलामीची लढत ६-० (२९-२७, २८-२७, २८-२४) अशी जिंकली, पण त्यानंतर तो ०-६ (२७-२८, २६-२७, २३-२४) असा पराजित झाला. 

जोरदार वाऱ्यांचा फटका प्रवीणला दुसऱ्या फेरीच्या लढतीच्यावेळी बसला. दुसऱ्या, तसेच तिसऱ्या सेटमध्ये एलिसनचा तीर भरकटला, पण प्रवीण जास्तच लक्ष्यापासून दूर राहिला. पहिल्या फेरीतील गुणांची पुनरावृत्ती प्रवीणने केली असली तरीही तो जिंकू शकला असता, पण त्याला पू्र्ण एकाग्रताही साधता आली नाही.


​ ​

संबंधित बातम्या