केजरीवाल सरकार पाहतेय ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दिल्लीत घेण्याचे स्वप्न

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 March 2021

खेळाबाबत आम्ही एक मोठे स्वप्न पाहिले आहे, तेही आम्ही सभागृहासमोर मांडणार आहोत. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दिल्लीत घेण्याचे आमचे स्वप्न आहे, असे दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

नवी दिल्ली : दिल्ली 2048 च्या ऑलिंपिक संयोजनासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात संयोजनाच्या प्रयत्नास दिशा दिल्याचे सांगितले. दिल्लीत ऑलिंपिक घेण्याच्या उद्दिष्टास आम्ही दिशा दिली आहे. दिल्ली या स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करेल. त्यासाठीच्या आवश्‍यक स्टेडियम आणि सुविधा तयार करण्यात येतील, असे केजरीवाल यांनी सांगितले. त्यांनी दिल्लीतील दरडोई उत्पन्न 2047  पर्यंत सिंगापूरइतके करण्याचे लक्ष्य असल्याचे सांगताना ऑलिंपिकबाबतही सांगितले.

खेळाबाबत आम्ही एक मोठे स्वप्न पाहिले आहे, तेही आम्ही सभागृहासमोर मांडणार आहोत. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दिल्लीत घेण्याचे आमचे स्वप्न आहे, असे दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. 1896 मध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांना अथेन्समध्ये सुरुवात झाली; पण ऑलिंपिकची ज्योत कधीही दिल्लीत आली नाही, असेही ते म्हणाले.

32 वे ऑलिंपिक टोकियोत होणार आहे. त्यानंतरच्या तीन स्पर्धांचे यजमान निश्‍चित झाले आहेत. आम्ही नवे क्रीडा विद्यापीठ सुरू करीत आहोत. नव्या क्रीडा सुविधा तयार होणार आहेत. क्रीडा स्पर्धांचे वातावरण, त्यातील चुरस वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्याद्वारे 39 वे ऑलिंपिक 2048 मध्ये दिल्लीत आयोजित होऊ शकेल, असे सिसोदिया यांनी सांगितले. 

2048 सध्या खूप दूर भासत असेल; पण ही स्पर्धा घेण्यासाठी दहा वर्षे अगोदर निविदा सादर करावी लागेल. ही निविदा सादर करताना स्पर्धा संयोजनाची तयारी किती आहे, हेही दाखवावे लागेल. ऑलिंपिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यासाठी 15 वर्षे लागतील, असेही त्यांनी सांगितले. 
 


​ ​

संबंधित बातम्या