सोशल मीडियावर रंगली चानूच्या सुवर्णपदकाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 July 2021

टोकियो ऑलिंपिकच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने रौप्यपदकाची अविस्मरणीय भेट भारतीयांना दिली. टीव्हीच्या माध्यमातून करोडो भारतीयांनी चानूची ही रौप्यझेप पाहिली आणि त्यानंतर सर्वांचा ऊर तिच्या या यशाने भरून आला.

मुंबई - टोकियो ऑलिंपिकच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने रौप्यपदकाची अविस्मरणीय भेट भारतीयांना दिली. टीव्हीच्या माध्यमातून करोडो भारतीयांनी चानूची ही रौप्यझेप पाहिली आणि त्यानंतर सर्वांचा ऊर तिच्या या यशाने भरून आला. फेसबुक, ट्विटरपासून व्हॉटस्ॲप डीपीपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय झाले. चानूच्या त्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या चीनच्या खेळाडूची उत्तेजक चाचणी करण्यात आली. त्यामुळे चानूच्या रौप्यपदकाचे रूपांतर आता सुवर्णपदकात झाले.

अनेक संकेतस्थळांनी या वृत्ताला ‘फोडणी’ दिली आणि त्यात शब्दांचे रंग भरत चानूला आता सुवर्णपदक मिळणार, असेच मथळे दिले. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चानू चर्चेत आली. कोणीही वास्तव काय आहे, हे तपासण्याची तसदी घेतली नाही. 

वास्तविक वृत्त होते सुवर्णपदक विजेत्या चीनच्या झिहुई होऊ हिच्या उत्तेजक चाचणीचे. याचा अर्थ ती उत्तेजक चाचणीत दोषी सापडली असा होत नाही. विजेत्या खेळाडूंची उत्तेजक चाचणी होते तसेच संपूर्ण ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या इतर खेळाडूंची रँडम उत्तेजक चाचणी होणे हा नित्याचाच भाग. चानूसुद्धा पदक विजेती असल्यामुळे तिचीही चाचणी होऊ शकते. ही स्पर्धा संपल्यानंतर दोन दिवसांनी झिहुईची चाचणी झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. 

चानुच्या रौप्यपदकाचे रुपांतर सुवर्णपदकात झाले याची सवंग चर्चा सोमवारी एकीकडे सुरू होती त्याचवेळी ती दुपारी नवी दिल्लीत टोकियोतून दाखलही झाली होती. झिहुईची चाचणी करण्यात आल्यामुळे चानूला टोकियोतच थांबण्यास सांगण्यात आल्याचेही अफवा पसरली होती.

वेटलिफ्टिंग संदर्भात सुरू असलेल्या चर्चांबाबत वाडा किंवा ऑलिंपिक समितीकडून अधिकृतपणे काहीही कळविण्यात आले नाही.
- राजीव मेहता, भारतीय ऑलिंपिक समिती, सचिव


​ ​

संबंधित बातम्या