पाचव्या क्रमांकावरील मनूला अंतिम फेरीची संधी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 July 2021

मनू भाकरने ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेतील २५ मीटर पिस्तूलमधील पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. पहिल्या प्रिसिशन प्रकारानंतर मनू पाचवी आहे, तर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली राही सरनोबत २५ व्या क्रमांकावर आहे.

टोकियो / मुंबई - मनू भाकरने ऑलिंपिक नेमबाजी स्पर्धेतील २५ मीटर पिस्तूलमधील पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. पहिल्या प्रिसिशन प्रकारानंतर मनू पाचवी आहे, तर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली राही सरनोबत २५ व्या क्रमांकावर आहे.

मनू तसेच राही शुक्रवारी रॅपिड प्रकारात लक्ष्यवेध साधतील. त्यानंतर सर्वोत्तम आठ नेमबाजांना अंतिम फेरीची संधी असेल. मनूने प्रिसिशनमध्ये ३०० पैकी २९२ गुण मिळविले आहेत, तर राहीचे २८७ गुण आहेत. माजी जागतिक विजेती झोराना अरुनॉविक (सर्बिया) २९६ गुणांसह अव्वल आहे.

आघाडीच्या अकरा नेमबाजांत केवळ तीन गुणांचा फरक आहे, त्यावरून चुरस लक्षात येईल. मनूइतकेच गुण दहा मीटर एअर पिस्तूलमधील विजेती वितालिना बॅत्साराश्किना तसेच मिश्र दुहेरीतील ब्राँझ विजेती ओलेना कॉस्तेविच यांचे आहेत.

दोन स्पर्धांतील अपयशानंतर होत असलेल्या टीकेचा विचार न करता मनूने लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले. तिने पहिल्या दोन फैरीत ९७ गुण मिळविले. तिसऱ्या फैरीत केवळ दोनदाच नऊ असल्याने तिने या फैरीत ९८ गुणांची नोंद केली. तिचे अखेरचे पाच शॉट दहा गुणांचे होते. गेल्याच महिन्यात विश्वकरंडक जिंकलेल्या राहीला पहिल्या फैरीत ९६ आणि दुसऱ्या फैरीत ९७ गुणांवर समाधान  मानावे लागले.


​ ​

संबंधित बातम्या