कोरियाच्या पथकाकडून अन्नातील रेडिएशन तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा राजकारणासाठी उपयोग करू नका, असे आवाहन सातत्याने करण्यात येते, पण नेमके तेच घडत असते. आपल्या संघातील खेळाडूंसाठी स्वतंत्रपणे भोजन करण्याचा निर्णय दक्षिण कोरियाने घेतला.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा राजकारणासाठी उपयोग करू नका, असे आवाहन सातत्याने करण्यात येते, पण नेमके तेच घडत असते. आपल्या संघातील खेळाडूंसाठी स्वतंत्रपणे भोजन करण्याचा निर्णय दक्षिण कोरियाने घेतला, तसेच भोजनासाठी पुरवण्यात येणाऱ्या धान्याची रेडीएशन तपासणी होईल, असे सांगत कोरियाने जपानला डिवचले आहे.

दहा वर्षांपूर्वी फुकुशिमा सुनामी तसेच तेथील न्यूक्लीअर दुर्घटनेनंतर कोरियाने जपानमधून सीफूड आणण्यावर निर्बंध घातले होते. त्यावेळी दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. आता पुन्हा कोरिया हेच करीत आहे. आम्ही कोरियाच्या खेळाडूंचे भोजन करण्यासाठी क्रीडानगरी शेजारील हॉटेल आरक्षित केले आहे. आम्ही यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळीही हेच केले होते, असा दावा दक्षिण कोरिया करीत आहे.

खरं तर या सर्व घडामोडीस दोन देशांच्या प्रमुखांची रद्द झालेली भेट हे कारण मानले जात आहे. स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यास कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन जाणार होते, पण हा दौरा रद्द करण्यात आला आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना भेट नाकारल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियाने आपल्या संघाचा मुक्काम असलेल्या बाल्कनीत १६ व्या शतकातील जपानबरोबरच्या युद्धाचा उल्लेख केलेला फलक झळकावला होता, पण तो आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने काढून टाकण्यास सांगितले.

अमेरिका संघासोबतही शेफ आहेत, पण कोरियाचे शेफ चर्चेत आहेत. आपल्या खेळाडूंना पुरवल्या जाणाऱ्या भोजनात रेडिओअॅक्टीव कॅशियम लेवल कमी असावी हा आमचा प्रयत्न आहे, असे कोरियाकडून सांगण्यात आले. त्यासाठी आम्ही देण्यात येत असलेल्या सर्व खाद्यपदार्थांचीच चाचणी करीत आहोत. जपानने त्यास थेट उत्तर देणे टाळले, पण आम्ही सर्व पदार्थांची पूर्ण माहिती देत आहोत, अशी टिप्पणी केली. जपानने यापूर्वीच फुकुशिमा प्रांतातील पदार्थ न आणण्याचे ठरवले आहे.


​ ​

संबंधित बातम्या