ऑलिंपिकमध्ये वाया गेलेल्या अन्नाचाही फेरवापर होणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 July 2021

ऑलिंपिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याच्या दिवशी स्वयंसेवकांवर अतिकामाचा ताण असल्यामुळे त्यांना जेवण्याची संधी मिळाली नाही म्हणून अन्न वाया गेले असले तरी, त्याचा फेरवापर करण्यात आला. मात्र एकूणच प्रकाराबद्दल  माफीही मागितली आहे.

टोकियो - ऑलिंपिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याच्या दिवशी स्वयंसेवकांवर अतिकामाचा ताण असल्यामुळे त्यांना जेवण्याची संधी मिळाली नाही म्हणून अन्न वाया गेले असले तरी, त्याचा फेरवापर करण्यात आला. मात्र एकूणच प्रकाराबद्दल  माफीही मागितली आहे.

टोकियो ऑलिंपिकचे प्रवक्ते मासानोरी ताकाया यांनी पत्रकार परिषदेत, अन्न बाहेर फेकावे लागल्याची कबुली दिली. त्यानुसार स्पर्धेतील स्वयंसेवकांसाठी पूर्वमागणी केलेल्या १० हजार अन्नाच्या पाकिटांपैकी अंदाजे चार हजार पाकिटे वाया गेली, असे ताकाया यांनी सांगितले. स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमावेळी मोठ्या प्रमाणात अन्नसेवन झाले नाही, त्यामुळे जेवण शिल्लक राहिले. स्वयंसेवकांवर अतिकामाचा ताण होता, त्यामुळे कदाचित त्यांना जेवण्यास वेळ मिळाला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. वाया गेलेले अन्न पशुखाद्य ठरले, तसेच बायोमास वीज निर्मितीसाठी वापरण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ऑलिंपिकला सुरुवात झाली, त्या २३ जुलै रोजी अंदाजे २० ते ३० टक्के अन्न जादा ठरल्याचेही ताकाया यांनी नमूद केले. मागणी प्रक्रियेवर नियंत्रण आणण्याचे, तसेच वाया घालविण्याऐवजी अन्न सेवन होईल याकडे ध्यान देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 

टोकियो स्पर्धेत पुठ्ठ्याचे पलंग, पदकासाठी रिसायकल धातू वापरण्यात आले आहेत. पर्यावरणास अनुकूल स्पर्धा हा त्यामागचा उद्देश आहे. `ग्रह आणि लोकांसाठी एकत्रित चांगले व्हा,` हे स्पर्धेचे घोषवाक्य आहे. टोकियो २०२० टिकाव योजनेअंतर्गत कार्बन उत्सर्जन, ऊर्जा, कचरा आणि अन्न या विषयांचा त्यात समावेश आहे.


​ ​

संबंधित बातम्या