अफगाणच्या माजी महिला खेळाडूची अमेरिकेला साद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

परिस्थिती एकदमच हाताबाहेर जायच्या अगोदर अफगाणिस्तानमध्ये अव्वल महिला अॅथलेटिक्स खेळाडू आणि प्रशिक्षक स्टाफ यांना देशाबाहेर नेण्याचे आर्जव अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्या समिरा अशघारी यांनी अमेरिकेला केले आहे.

काबूल - परिस्थिती एकदमच हाताबाहेर जायच्या अगोदर अफगाणिस्तानमध्ये अव्वल महिला अॅथलेटिक्स खेळाडू आणि प्रशिक्षक स्टाफ यांना देशाबाहेर नेण्याचे आर्जव अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्या समिरा अशघारी यांनी अमेरिकेला केले आहे.

१९९६ चे २००१ या कालावधीतील तालिबानी राजवटीत महिलांवर सर्व प्रकारचे निर्बंध होते. मुलींना शाळेत जाता येत नव्हते. बुरख्याशिवाय तसेच कोणच्या साथीशिवाय बाहेरही फिरता येत नव्हते. आता पुन्हा तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा केला आहे आणि हेच निर्बंध पुन्हा लावण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानच्या महिला बास्केटबॉल संघाची माजी कर्णधार असलेल्या अशघारी हिने देशातील महिला अॅथलीटबाबत भीती व्यक्त केली आहे. खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांची तालिबानकडून सुटका करा. परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर काही तरी करा, असे ट्विट अशघारी हिने केले आहे आणि अमेरिका बास्केटबॉल फेडरेशन, अमेरिका ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक समिती तसेच अफगाणिस्तानमधील अमेरिका दूतावासाला टॅग केले आहे.

अफगाणिस्तानच्या क्रीडा क्षेत्रात अशघारीचे योगदान राहिले आहे. ती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीत या देशाचे प्रतिनिधीत्व करणारी पहिली अफगाण महिला आहे. २०१८ पासून ती या पदावर आहे.

क्रीडा साहित्य जाळून टाका
अफगाण महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार खलिदा पोपल सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. तुमची ओळख दाखणारे यापूर्वीचे ट्विट रद्द करा; तसेच तुमच्याकडे असलेले क्रीडा साहित्यही जाळून टाका, असा सल्ला खलिदाने अफगाणिस्तानमधील आपल्या सहकारी खेळाडूंना दिला आहे.


​ ​

संबंधित बातम्या