१३ वर्षीय मुलीचे सुवर्ण तर, तलवारपटूला लग्नाचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 July 2021

कोरोनाच्या नैराश्यमय वातावरणात होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जपानचा विरोध असला तरी तेरा वर्षीय मुलीने सुवर्णपदक जिंकल्याने यजमानांना ऑलिंपिकमुळे होणाऱ्या कोरोनाच्या धास्तीचा विसर पडला.

टोकियो - कोरोनाच्या नैराश्यमय वातावरणात होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेस जपानचा विरोध असला तरी तेरा वर्षीय मुलीने सुवर्णपदक जिंकल्याने यजमानांना ऑलिंपिकमुळे होणाऱ्या कोरोनाच्या धास्तीचा विसर पडला. दरम्यान, तलवारबाजी स्पर्धेच्या ठिकाणी दहा वर्षांपूर्वीचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला गेल्यामुळे उपस्थितांत आनंदाची लहर पसरली.

तेरा वर्षीय मोमिजी निशल्या हिने ऑलिंपिकमध्ये प्रथमच समावेश करण्यात आलेल्या स्ट्रीट स्केटबोर्डिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी जपान पदक क्रमवारीत अव्वल आले होते. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची लोकप्रियता कमी होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच जपानने ऑलिंपिकमध्ये यश मिळविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फायदा सुगा यांना होईल, असे मानले जात आहे. दरम्यान, जलतरण स्पर्धेत टर्मिनेटरने खेळातील डॉमिनेटरला मागे टाकले. शरणार्थी संघात असलेला बॉक्सर एल्द्रिक सेल्ला याचे ऑलिंपिक सहभागाचे स्वप्न ६७ सेकंदच टिकले. 

पराभवानंतर लग्नाचा प्रस्ताव
मारिया बेलेन पेरेझ मॉरिस ही अर्जेंटिनाची तलवारबाजीतील स्पर्धक पराभवामुळे निराश होऊन रिंगबाहेर येत होती. अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू आले. तिच्या मार्गदर्शकांनी तिला एक कागदी फलकावर माझ्याशी लग्न करशील का, असे जाहीरपणे विचारले. दहा वर्षांपूर्वी मार्गदर्शक ल्युकास गुलेर्मो सॉसेदा यांनी याच प्रकारे विचारले होते, त्यावेळी बेलेनने नकार दिला होता, पण यावेळी तिने होकार दिला.
बेलेन हंगेरीच्या अॅन्ना मॉर्तन हिच्याविरुद्ध १२-१५ अशी पराजित झाली. त्यामुळे ती निराश असताना लग्नाचा प्रस्ताव आला आणि ती सगळे काही विसरली.

टॉम देईली अखेर विजेता
चार ऑलिंपिक स्पर्धा खेळलेल्या ब्रिटनच्या टॉम देईली याने अखेर सुवर्णपदक जिंकले. त्याने मॅट्टी ली याच्या साथीत १० मीटर सिंक्रोनाईझ्ड डायव्हिंगमध्ये बाजी मारली. त्याने याद्वारे स्पर्धेतील चीनची मक्तेदारी मोडली. माझ्या यशामुळे एलजीबीटी समुदायातील मुला-मुलींना आपणही ऑलिंपिक जिंकू शकतो हा विश्वास निर्माण होईल, असे त्याने सांगितले.

दरम्यान, टर्मिनेटर बिरुदावलीस जागताना एरियन टिटमस हिने अमेरिकेच्या कॅटी लेदेस्की हिला मागे टाकत ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत जिंकली. एरियनच्या यशामुळे जलतरणातील ऑस्ट्रेलिया - अमेरिका संघर्ष सुरू झाला असे मानले जात आहे. जिंकले यावर विश्वासच बसत नाही, असे टिटमसने सांगितले.

अमेरिकेने ४ बाय १०० मीटर रिले शर्यत जिंकली, तर ब्रिटनच्या अॅडम पीएटी याने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीतील सुवर्णपदक राखले. अमेरिकेतील प्राईम टाईमला शर्यतीचे प्रक्षेपण व्हावे यासाठी जलतरण, तसेच अॅथलेटिक्समधील अनेक स्पर्धा शर्यतीच्या अंतिम फेऱ्या सकाळी होत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या