ISSF World Cup: नेमबाजीत भारताचे वर्चस्व; पदकांच्या टॅलीवर एक नजर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 March 2021

चिंकी, राही आणि मनूने पहिले तीन क्रमांक जिंकल्याने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत प्रथमच भारतीय नेमबाजांनी एका स्पर्धेतील तीनही पदके जिंकली. 

मुंबई : टोकियो ऑलिंपिक क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील 25 मीटर पिस्तुल प्रकारासाठी भारतीय संघनिवडीची डोकेदुखी चिंकी यादव, राही सरनोबत आणि मनू भाकर यांनी वाढवली आहे. तिघींनी चुरशीच्या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश मिळवले. दरम्यान, ऐश्‍वर्य सिंग तोमरने पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

भोपाळ येथील टीटी नगर स्टेडियममध्ये काम करणाऱ्या इलेक्‍ट्रिशियनची मुलगी असलेल्या चिंकीने जिगरबाज राहीला शूटऑफवर 4-3 असे पराजित करीत सुवर्णपदक जिंकले. निर्धारित फैरीनंतर 32-32 बरोबरी होती. राहीने त्यापूर्वी अंतिम फेरीस पात्र ठरताना मनू भाकरला शूट ऑफवर हरवले होते. त्यात राही 29-28 अशी सरस ठरली. अर्थात चिंकी, राही आणि मनूने पहिले तीन क्रमांक जिंकल्याने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत प्रथमच भारतीय नेमबाजांनी एका स्पर्धेतील तीनही पदके जिंकली. 

Shooting World Cup : राहीचा 'चंदेरी' वेध! शूट आउटमध्ये चिंकीनं पटकावलं सुवर्ण

चिंकीने या स्पर्धेत बाजी मारून प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेत पदक जिंकले. राही आणि मनू या नावाजलेल्या नेमबाजांचा सामना करताना माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. दडपण असतानाही मी चांगली नेमबाजी करू शकते हे अंतिम फेरीचा शूटऑफ जिंकून दाखवले. या पदकामुळे माझा ऑलिंपिकसाठी विचार होईल, अशी अपेक्षा चिंकीने व्यक्त केली. ऐश्‍वर्यने विश्‍वकरंडक वरिष्ठ स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकले. सुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या ऐश्‍वर्यने हंगेरीच्या इस्तावन पेनी याला 462.5- 461.6 असे चकवले.

पदक क्रमवारी

देश      सुवर्ण रौप्य  ब्राँझ
भारत  9 5 5
अमेरिका 3 2 1
कझाकस्तान 1 2 1
आयर्लंड   1 1 -
डेन्मार्क  2 - 1

 
 


​ ​

संबंधित बातम्या