ISSF World Cup : भारतीय नेमबाजांचा ‘षटकार’

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 March 2021

विश्वकरंडक नेमबाजीमध्ये  सलग सहाव्या स्पर्धेत अव्वल कामगिरी
 

मुंबई : भारताच्या पिस्तूल आणि रायफल नेमबाजांनी सलग सहाव्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील सर्वाधिक पदके जिंकण्याचाही पराक्रम केला असल्याचे नेमबाजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 2019 च्या फेब्रुवारीपासून भारताचे पिस्तूल आणि रायफल नेमबाज विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा पराक्रम करीत आहेत. सलग सहाव्या स्पर्धेत भारतीयांनी ही कामगिरी साधली. 2019 च्या दिल्ली स्पर्धेपाठोपाठ बीजिंग, म्युनिच, रिओ दे जेनेरिओ या विश्‍वकरंडक स्पर्धेत तसेच चीनमधील विश्‍वकरंडकाच्या अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवला.

त्यानंतर आता 2021 च्या दिल्ली स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. दिल्ली स्पर्धेतील सुवर्णपदकात प्रमुख वाटा ऑलिंपिकमध्ये नसलेल्या स्पर्धांचा तसेच मिश्र दुहेरीतील सुवर्णपदकांचा आहे. भारताने 15 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 ब्राँझसह एकंदर 30 पदके जिंकताना स्पर्धक देशांना सहज मागे टाकले. पदक क्रमवारीत दोन ते पाच क्रमांकावरील देशांची एकंदरीत सुवर्णपदकेही 10 झाली नाहीत, त्यावरून भारताची हुकुमत लक्षात येईल. दरम्यान, रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी श्रेयासी सिंग, मनीषा किर, राजेश्‍वरी कुमारी यांनी महिला ट्रॅपमध्ये सुवर्णपदक जिंकताना कझाकस्तानला 6-0 असे हरवले.

ISSF World Cup : ऑलिम्पिंकसाठी तेजस्विनीला मिळाला 'सोनेरी' बूस्ट

क्‍यानन चेनाई, पृथ्वीराज तोंदेईमान, लक्ष्य शेरॉन यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ट्रॅप सांघिक पुरुषांच्या अंतिम लढतीत स्लोवाकियास 6-4 असे पराजित केले; मात्र विजयवीर सिद्धू, गुरप्रीत सिंग आणि आदर्श सिंग यांचा समावेश असलेला भारतीय संघ 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेविरुद्ध 2-10 असा पराजित झाला.

ISSF World Cup : विजयवीर सिद्धू- तेजस्विनीची रॅपिड फायरमध्ये गोल्डन कामगिरी

भारतीयांची यशोगाथा
 एकंदर 30 सुवर्णपदकांसाठी लढत
 यात भारताने निम्मी 15 सुवर्णपदके जिंकली
 22 देशांनी एकंदर 82 पदके जिंकली
 भारताने एकंदर पदकांच्या 36 टक्के पदके जिंकली
 स्पर्धेत 53 देशांचा सहभाग

16 वी ऑलिंपिक पात्रता हुकली

भारताने दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट केली, पण 16 वी ऑलिंपिक पात्रता हुकली असल्याचे सांगितले जात आहे. विजयवीर सिद्धू 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदकच जिंकू शकल्याने या स्पर्धेतून असलेली एकमेव ऑलिंपिक पात्रता दुरावली. हेच क्‍यानन चेनाई पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत चौथा आल्यामुळे घडले. रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिष भावनाला अथवा गुरप्रीत सिंगने वैयक्तिक स्पर्धेत यश मिळवले असते तर जागतिक क्रमवारीनुसारही पात्रता मिळण्याची शक्‍यता होती, पण ती दुरावली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पदक क्रमवारी

देश   सुवर्ण  रौप्य ब्राँझ  एकूण
भारत 15 9 6 30
अमेरिका 4 3 1 8
इटली 2 - 2 4
डेन्मार्क   2 - 1 3
पोलंड   1 3 3 7

 


​ ​

संबंधित बातम्या