बॉक्‍सिंग संघास कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 31 March 2021

आठ बाधितांपैकी सात भारतीय आज मायदेशी परतण्याची शक्‍यता
 

मुंबई : तुर्कीतील स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय बॉक्‍सिंग संघातील आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील सात जण भारतीय संघासाठी उद्या मायदेशी दाखल होत आहेत, पण एकास तुर्कीत थांबणे भाग पडणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा उपविजेता गौरव सोळंकी (57 किलो), प्रयाग चौहान (75 किलो) आणि ब्रिजेश यादव (81 किलो) या बॉक्‍सरना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची एका आठवड्यापूर्वी चाचणी झाली होती. त्यात हे पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे 19 मार्चला स्पर्धा संपल्यावरही या सर्व खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागले होते.

IPL 2021 : पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाचे ओझे

तीन बॉक्‍सरसह धर्मेंद्र यादव, संतोष बिरमोळे या मार्गदर्शकांसह फिझिओथेरपिस्ट शिखा केडिया, डॉ. उमेश, व्हिडीओ विश्‍लेषक नितीन कुमार हेही विलगीकरणात आहेत. तुर्कीतील बॉस्फोरस स्पर्धेत गौरवनेच केवळ पुरुष विभागात पदक जिंकले होते.  महिलांच्या स्पर्धेतील एकमेव पदक निखत झरीन (51 किलो) हिने जिंकले होते. तुर्कीस गेलेल्या भारतीय संघात ललित प्रसाद (52 किलो), शिवा थापा (63 किलो), दुर्योधन सिंग नेगी (69 किलो), नमन तन्वर (91 किलो), क्रिशन शर्मा (91 किलोपेक्षा जास्त) या पुरुष तसेच सोनिया लाथेर (57 किलो), परवीन (60 किलो), ज्योती ग्रेवाल (69 किलो) आणि पूजा सैनी (75 किलो) यांचा समावेश होता.

‘बबल’चा येतोय उबग, जैव सुरक्षा वातावरणात किती काळ राहायचे?

भारतीय संघातील सर्व सदस्यांची मंगळवारी पुन्हा चाचणी झाली. त्यात निगेटिव्ह आढळलेल्या सर्वांना मायदेशी पाठवण्यात येईल असे तुर्की आधिकाऱ्यांनी सांगितले होते. आता भारतीय बॉक्‍सिंग महासंघाचे सचिव हेमंत कुमार कलिता यांनी बाधितांपैकी एक सदस्य सोडल्यास उर्वरित मायदेशी परततील असे कळवले आहे.

तुर्की स्पर्धेत खेळल्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झाला. विलगीकरण लक्षात घेतल्यास चार ते पाच आठवड्यांच्या सरावास मुकावे लागणार आहे. यात वाढही होऊ शकते.
- भारतीय संघातील बॉक्‍सर
 


​ ​

संबंधित बातम्या