कोरोनामुळे ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतून भारतीय ज्युदो संघाची माघार

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 April 2021

कोरोना चाचणीत एका भारतीय खेळाडूस बाधा झाल्याचे आढळले आणि स्पर्धा नियमानुसार भारतीय संघास माघार घ्यावी लागली.

नवी दिल्ली - आशिया ओशियाना ऑलिंपिक पात्रता ज्युदो स्पर्धेतून भारतीय संघास माघार घेणे भाग पडले. बिशेकला होणाऱ्या या स्पर्धेपूर्वीच्या कोरोना चाचणीत एका भारतीय खेळाडूस बाधा झाल्याचे आढळले आणि स्पर्धा नियमानुसार भारतीय संघास माघार घ्यावी लागली.

या स्पर्धेसाठी वजन चाचणी ५ एप्रिलला होणार होती; मात्र संघ दाखल होताच झालेल्या चाचणीत एकास बाधा झाली. त्यामुळे भारतीय संघातील १२ ज्युदोपटूंनाही स्पर्धेबाहेर जावे लागले. यास्पर्धेद्वारे सुशिला देवी (४८ किलो) आणि तुल्लीका मान (७८ किलो) या दोन महिलांसह जसलीन सिंग सैनी (६६ किलो) आणि अवतार सिंगला (१०० किलो) पात्रतेची संधी असेल असे मानले जात होते. आता सर्व संघ १४ दिवस विलगीकरणात आहे, असे भारतीय ज्युदो महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी खेळाडूंना काही गटाने पाठवणे उचित ठरेल. संघ एकत्रित गेला आणि एकास बाधा झाली तर त्याचा फटका सर्वांना बसेल असे आम्ही सांगत होतो, पण पदाधिकारी संघाच्या एकत्रित प्रवासावर आग्रही होते, असे संघासोबतच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या