महिला वेटलिफ्टर उत्तेजक चाचणीत दोषी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 April 2021

ऑलिंपिक पात्रता स्पर्धेस मुकणार; ‘ब’ नमुन्यातही दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई 
 

नवी दिल्ली : ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान जवळपास निश्‍चित असलेली महिला वेटलिफ्टर उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. तिला भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने तात्पुरते बडतर्फ केले आहे. ‘ब’ नमुन्यातही दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई होईल. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक नियमानुसार अंतिम अहवाल येईपर्यंत दोषी खेळाडूचे नाव जाहीर करणे टाळले आहे, पण या महिला वेटलिफ्टरने राष्ट्रीय विक्रम केला आहे तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तिची आशियाई स्पर्धेसाठी निवड निश्‍चित होती, असे वेटलिफ्टिंग महासंघातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

तिने दोन वर्षापूर्वी करनाम मल्लेश्वरीचा विक्रम मोडला होता. ती उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल दोन आठवड्यापूर्वी आला होता, असे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू तसेच मार्गदर्शक विजय शर्मा अमेरिकेत प्रशिक्षणास गेले होते. त्यावेळी ही वेटलिफ्टर शिबिरातून रजा घेऊन घरी गेली होती. ती शिबिरात परतल्यावर महासंघाने तिची उत्तेजक चाचणी करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या या चाचणीचा अहवाल नुकताच आम्हाला मिळाला आहे, असेही अन्य एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  त्यांनी यामुळे आता टोकियो ऑलिंपिकसाठी भारताचे दोनच वेटलिफ्टर ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील असे सांगितले जात आहे.

कुस्तीगीरास चाचणीपासून रोखले

भारताचा आघाडीचा कुस्तीगीरही उत्तेजक चाचणीत दोषी ठरला होता, त्याला भारतीय संघाच्या निवड चाचणीत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. या कुस्तीगीराची इटलीतील स्पर्धेसाठी निवड झाली होती, पण तो आशियाई ऑलिंपिक पात्रता खेळला नाही, असे सांगण्यात आले. या कुस्तीगीराने बंदी घातलेल्या गोळ्या घेतल्या असल्याचे समजते.

नटराजनची सुंदर ड्राइव्ह; आनंद महिंद्रांना दिलं खास रिटर्न गिफ्ट

ॲथलीटही चाचणीत दोषी?

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी झालेल्या भारतीय ग्रांप्रि ॲथलेटिक्‍स स्पर्धा शर्यतीत एक स्पर्धक उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याचे समजते. याची चर्चा भारतीय ॲथलेटिक्‍स वर्तुळात दबक्‍या आवाजात सुरु आहे. आता याबाबतचा निर्णय जाहीर झाल्यास संबंधित ॲथलीटला ऑलिंपिकला मुकावे लागेल असेही सांगितले जात आहे.

त्या वेटलिफ्टरने घरी हर्बल पदार्थ खाल्ले असण्याची शक्‍यता आहे. काही हर्बल पदार्थात बंदी घातलेल्या उत्तेजकांचा समावेश असतो. आम्ही तिला यापूर्वीच घरी जाण्यास सांगितले आहे. 
- वेटलिफ्टींग महासंघाचे पदाधिकारी


​ ​

संबंधित बातम्या