गाव-खेड्यात, वाडीसह वस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 June 2021

ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात, गाव खेड्यात, वाडी वस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री, तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

मुंबई - ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात, गाव खेड्यात, वाडी वस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री, तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. टोकियो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी पदक जिंकून परत येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

जागतिक ऑलिंपिक दिनानिमित्त, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेने खास कार्यक्रम घेतला होता. त्यात उपमुख्यमंत्री पवार हे ऑनलाईन उपस्थित होते. टोकियो ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या राही सरनोबत, तेजस्विनी सावंत (नेमबाजी), प्रवीण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), स्वरूप उन्हाळकर (पॅरा शूटिंग), सुयश जाधव (पॅरा जलतरण) यांच्यासह माजी ऑलिंपिक खेळाडूंचाही यावेळी ऑनलाईन सत्कार करण्यात आला.

जागतिक ऑलिंपिक दिन साजरा करत असताना, १९५२ च्या हेलसिंकी स्पर्धेत देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आठवण होते. ही कामगिरी महाराष्ट्राच्या सुपुत्राने केली होती. 

ऑलिंपिक स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पाठीशी राज्य सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. राज्यातील खेळाडू ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करून देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ३६ ऑलिंपिकपटूंचा ऑनलाईन गौरव करण्यात आला.


​ ​

संबंधित बातम्या