वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत परदेशी नेमबाजासह तिघांना कोराना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 March 2021

या खेळाडूला संसर्ग झालेला असला तरी त्याचे सहकारी आणि सपोर्ट स्टाफ यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. याशिवाय तीन भारतीय खेळाडूंचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी झाली आहे. 

नवी दिल्ली : कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सुरू होत असलेल्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. एका अव्वल आंतरराष्ट्रीय नेमबाजाला कोरोनाचा संसर्ग झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आचारसंहितेनुसार त्या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आले नाही. ही विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होत असताना एका नेमबाजाला कोरोनाची बाधा झाली आणि त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी दिली. या खेळाडूला संसर्ग झालेला असला तरी त्याचे सहकारी आणि सपोर्ट स्टाफ यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. याशिवाय तीन भारतीय खेळाडूंचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी झाली आहे. 

संसर्ग झालेल्या या नेमबाजाची विमानतळावर पहिली चाचणी झाली होती. त्यानंतर काल पुन्हा त्याची चाचणी करण्यात आली. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत; मात्र तो कर्णी सिंग शूटिंग रेंजवर गेला नव्हाता.या स्पर्धेत कोरिया, सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड आणि तुर्कस्थान आदी देशांसह ५३ देशांनी सहभाग निश्‍चित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग फेडरेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत ही स्पर्धा होणार आहे.

सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत येणाऱ्या प्रत्येक नेमबाजाची विमानतळावर पहिली चाचणी करण्यात आली आणि स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरही चाचणी करण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या