यशस्विनीचा 'सुवर्ण' वेध; ‘भारतमाता की जय’ म्हणत साजरा केला आनंद  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 March 2021

विश्‍वकरंडक नेमबाजीत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्यात यश
 

मुंबई :  ‘भारतमाता की जय’ असे जोरात म्हणत यशस्विनी सिंग देसवाल हिने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाचा आनंद साजरा केला. भारताच्याच मनू भाकरला मागे टाकत तिने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ही सुवर्ण कामगिरी केली. अखेरच्या शॉटमध्ये लक्ष्यापासून दूर राहिल्याने सौरभ वर्माला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याच दहा मीटर एअर पिस्तूल पुरुषांच्या स्पर्धेत अभिषेक वर्माने ब्राँझ जिंकले. अखेरचा शॉट शिल्लक असताना सौरभ 0.3 गुणांनी आघाडीवर होता, पण अखेरच्या शॉटमध्ये सौरभ 9.8 गुण नोंदवत असताना आयर्लंडच्या जावेद फारुकी7ने 10.5 गुण मिळवत बाजी मारली. अर्थात जावेदने शेवटून दुसऱ्या शॉटला चुकी केल्यामुळे सौरभ अव्वल झाला होता.

भारतीय नेमबाजाने सुवर्णपदक जिंकल्यावर प्रेक्षकांत असलेले सहकारी नेमबाज ‘भारतमाता की जय’ म्हणतात, मात्र आता चाहते नसल्यामुळे देशाची शान उंचावल्याचा आनंद मीच साजरा करायचा ठरवले, असे यशस्विनीने सांगितले. तिने अंतिम फेरीत 238.8 गुणांचा वेध घेताना मनूला (236.7) 2.1 गुणांनी मागे टाकले होते. अंतिम फेरी सुरू झाल्यापासून यशस्विनीने घेतलेली आघाडी क्वचितच गमावली असेल. भारताची तिसरी नेमबाज निवेता परमानांथम चौथी आली.

INDvsENG : बदलाच्या प्रयोगात विराट-रोहित जोडी ठरली हिट

कोरोना महामारी असताना ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल यशस्विनीवर बंदी घालण्यात आली आहे. ती ऑलिंपिक संपल्यावर अमलात येईल. कदाचित यशस्विनीने त्यामुळेच जास्त जिद्दीने खेळ केला असावा. अर्थातच सुवर्णपदक जिंकल्यावर त्याबाबत तिने टिप्पणी करणे टाळले. यशस्विनी आणि मनू यांच्यात सुरुवातीस चांगली चुरस होती, पण सलग चार शॉटमध्ये लक्षयापासून दूर राहिल्याने मनू मागे पडत गेली.

दिव्यांशला ब्राँझपदक

दिव्यांश सिंग पन्वरने भारताचे पहिले पदक जिंकले. तो दहा मीटर एअर रायफल प्रकारात तिसरा आला. पात्रतेत आठवा आलेल्या दिव्यांशने अंतिम फेरीत 228.1 गुणांचा वेध घेतला. पहिलीच वरिष्ठ विश्‍वकरंडक स्पर्धा खेळणारा अर्जुन बबुता पाचवा आला. त्याचे 185.5 गुण झाले. दीर्घ कालावधीनंतर स्पर्धेत खेळल्याचे दडपण आले होते. अंतिम फेरीच्यावेळी मी खूपच नर्व्हस होतो. हे पहिल्यांदाच घडले, असे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या दिव्यांशने सांगितले.  ऑलिंपिकमध्ये यश हवे असेल तर अंतिम फेरीत शांतपणे नेमबाजी करणे महत्त्वाचे असते. ऑलिंपिकपूर्वीच्या दोन विश्‍वकरंडक स्पर्धेत हेच लक्ष्य आहे. दिल्लीत तरी हे काही प्रमाणात साधले आहे. मनावर विजय मिळवला तर अंतिम फेरी जिंकता येते. - यशस्विनी सिंग देसवाल


​ ​

संबंधित बातम्या