ऑलिंपिकसाठी 90 हजार परदेशी रहिवाशांची मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 March 2021

गतवर्षी होणारी ही स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली, अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे, त्यामुळे सुरक्षित ऑलिंपिक घेण्यासाठी टोकियो ऑलिंपिक संयोजन समिती पावले उचलत आहे.

 टोकियो :  काही महिन्यांवर आलेल्या टोकियो ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जपानने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने आखणीही तयारी केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षक असे सर्व मिळून 90 हजारच परदेशी या स्पर्धेसाठी टोकियोत येतील, असे स्पष्ट करण्यात आले. गतवर्षी होणारी ही स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली, अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे, त्यामुळे सुरक्षित ऑलिंपिक घेण्यासाठी टोकियो ऑलिंपिक संयोजन समिती पावले उचलत आहे.

ऑलिंपिक आणि त्यानंतर होणाऱ्या पॅरालिंपिक स्पर्धेसाठी सुमारे 15 हजार खेळाडू असतील, त्यानंतर उर्वरित 75 हजारांमध्ये प्रशिक्षक, रेफ्री, प्रायोजकांचे अधिकारी आणि मीडिया यांचा समावेश असेल, असे सांगण्यात आले आहे. ऑलिंपिकसाठी टोकियोत येण्यास उत्सुक असलेल्या प्रेक्षकांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. टोकियो ऑलंपिक संघटन समितीची बैठक होणार आहे, त्यात परदेशी प्रेक्षकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या