जपानमध्ये पाचवी लाट; निर्बंध अतिशय कडक पण पॅरालिंपिक स्पर्धा होणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 August 2021

जपानमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत असताना उद्यापासून आता पॅरालिंपिक स्पर्धेस सुरुवात होत आहे. काही दिवसांपूर्वी ऑलिंपिकचे आव्हान पेलले, पण पॅरालिंपिक स्पर्धा चिंता वाढवणारी ठरू शकते. उद्या या स्पर्धेचा उद्‍घाटन सोहळा होत आहे.

टोकियो - जपानमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत असताना उद्यापासून आता पॅरालिंपिक स्पर्धेस सुरुवात होत आहे. काही दिवसांपूर्वी ऑलिंपिकचे आव्हान पेलले, पण पॅरालिंपिक स्पर्धा चिंता वाढवणारी ठरू शकते. उद्या या स्पर्धेचा उद्‍घाटन सोहळा होत आहे.

टोकियोत अगोदरच कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रेक्षकांविना स्पर्धा शर्यती होणार आहेतच, पण त्याचबरोबर खेळाडू आणि स्पर्धांशी निगडित इतर सर्वांसाठी नियम कडक करण्यात आले आहेत. मुळात जपानवासीयांचा नकार असताना मुख्य ऑलिंपिक स्पर्धा पार पडली. आता तर जपानमध्ये कोरोनाची पाचवी लाट आलेली आहे.

संपूर्ण जपानमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या २५ हजार रुग्णांची नोंद झाली. गंभीर रुग्णांची वाढलेली संख्या ही चिंता करणारी ठरत आहे. द्विव्यांगांसाठी प्रतिष्ठेची असलेली ही स्पर्धा आहे आणि आम्हा सर्वांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीचे प्रमुख अँड्रू पर्सन्स यांनी सांगितले.

काटेकोर अंमलबजावणी
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑलिंपिकसाठी जे निमय होते तेच आताही आहेत, पण त्याची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंच्या स्पर्धा आहेत ते खेळाडू स्पर्धेपूर्वी काही दिवस क्रीडानगरीत दाखल होतील आणि त्यांच्या स्पर्धा शर्यती संपल्यानंतर ४८ तासांत त्यांना येथून बाहेर पडावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. प्रत्येकाची दररोज चाचणी करण्यात येणार आहे. तसेच सराव सुविधा आणि मुख्य स्पर्धा ठिकाण यामध्येही मुक्तपणे प्रवास करता येणार नाही.

चार खेळाडूंना कोरोना
टोकियोत पॅरालिंपिक स्पर्धेशी निगडित १३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात सर्वाधिक रुग्ण जपानस्थित पॅरालिंपिक अधिकारी आणि स्पर्धेची तयारी करणारे कर्मचारी आहेत, परंतु यात चार खेळाडंूचाही समावेश असल्याने चिंता वाढली आहे. 

खेळाडूंमध्ये उत्साह
कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे स्पर्धा कधीही रद्द होण्याची शक्यता असली, तरी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता सुवर्णपदकाचा लक्ष्यभेद करण्याची आमची वेळ आहे, असे अमेरिकेची तिरंदाज मॅट स्तुतझमानन सांगितले.

थोडक्यात महत्त्वाचे

  • सुमारे १६० देशांचा सहभाग
  • ४,४०० पॅरालिपिंक खेळाडू
  • २२ विविध खेळांच्या स्पर्धा-शर्यती
  • पॅरा बॅडमिंटन आणि तायक्वांदो या खेळांचा प्रथमच समावेश

उद्‍घाटन सोहळ्यात भारताचे ११ जण
उद्‍घाटन सोहळ्यात भारताचे पाच खेळाडू आणि सहा अधिकारी असे ११ सदस्य सहभागी होणार आहेत. दोन सुवर्णपदके जिंकणारा मरियप्पन थंगावेलू ध्वजधारक असणार आहे. त्याच्यासह थाळीफेक खेळाडू विनोद कुमार, भालाफेक खेळाडू टेक चंद आणि पॉवरलिफ्टर जयदीप तसेच साकिना खातून हे खेळाडू असतील.


​ ​

संबंधित बातम्या