टोकियोत आणीबाणी जाहीर करण्याचा जपान सरकारचा विचार

पीटीआय
Friday, 23 April 2021

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी टोकियोत आणीबाणी जाहीर करण्याचा जपान सरकारचा विचार आहे. त्यामुळे १०० दिवसांवर आलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे.

टोकियो - कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी टोकियोत आणीबाणी जाहीर करण्याचा जपान सरकारचा विचार आहे. त्यामुळे १०० दिवसांवर आलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे. केवळ कोरोना रोखण्यासाठी ही आणीबाणी आहे, असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने सांगितले, पण त्यानंतरही अनिश्चितता आहे.

जपानमध्ये मे च्या सुरुवातीस गोल्डन वीक साजरा होतो. याच कालावधीत आणीबाणी आणण्याची शिफारस टोकियोचे राज्यपाल युरोको कोईके यांनी केली आहे. ही आणीबाणी २९ एप्रिल ते ९ मे दरम्यान अपेक्षित आहे. टोकियोत पुन्हा आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे आम्हाला कळवण्यात आले आहे. गोल्डन वीकदरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय होण्याची शक्यता आहे. असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी समितीच्या कार्यकारिणीस सांगितले आहे.

कोरोनाचे नव्या स्वरूपाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर जपानमध्ये आढळत आहेत. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणीबाणीचा विचार असल्याचे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले आहे. एक वर्ष लांबवण्यात आलेले ऑलिंपिक नव्या कार्यक्रमानुसार होणार असल्याची ग्वाही जपान सरकार सातत्याने देत आहे.

ऑलिंपिकमध्ये निषेधास मनाई
ऑलिंपिक तसेच पॅराऑलिंपिकच्या वेळी पदक मंचावर तसेच स्पर्धा ठिकाणी निषेध करणाऱ्या क्रीडापटूंवर बंदी घालण्याचा इशारा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या क्रीडापटू आयोगाने दिला. आयोगाने हा निर्णय घेण्यापूर्वी खेळाडूंचा कल जाणून घेतला होता. दोन तृतियांश खेळाडूंनी पदक मंचावरील निषेधास विरोध केला आहे. नव्या निर्णयामुळे पदक स्वीकारल्यावर अथवा विजयानंतर कोणतीही राजकीय टिप्पणी केल्यास कारवाई होईल. गेल्या काही महिन्यांत कृष्णवर्णीय खेळाडूंनी गुडघे झुकवत आपल्यावरील अन्यायाचा निषेध व्यक्त केला आहे. त्यास ऑलिंपिकमध्ये मनाई असेल.


​ ​

संबंधित बातम्या