ऑलिंपिक ज्योतीचा प्रवास ओसाड रस्त्यावरून

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

तीन आठवड्यांपूर्वी ज्योतीचा प्रवास सुरू झाला. २३ जुलैपर्यंतच्या या प्रवासात विविध १० हजार धावक ज्योत वाहून नेतील.

ओसाका - कोरोना महामारीचा धोका वाढत असताना टोकियो ऑलिंपिक संयोजन आव्हानात्मक असेल, याची प्रचीतीच ओसाकातील ऑलिंपिक ज्योतीच्या प्रवासात आली. ओसाकातील कोरोना रुग्णांची एका दिवसातील विक्रमी नोंद होत असताना ज्योतीचा प्रवास शहरातील ओसाड रस्त्यावरून झाला. तीन आठवड्यांपूर्वी ज्योतीचा प्रवास सुरू झाला. २३ जुलैपर्यंतच्या या प्रवासात विविध १० हजार धावक ज्योत वाहून नेतील. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ज्योतीच्या ओसाकातील प्रवासास मनाई करण्यात आली होती. ही ज्योत ओसाकात आली, पण तिचा प्रवास पाहण्यापासून ओसाकावासीयांना दूर ठेवण्यात आले. ओसाका सिटी पार्कमध्ये केवळ तिचा प्रवास झाला. त्या वेळी त्या रस्त्यावर कोणीही नव्हते.

जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तिथे लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. तिथे साडेनऊ हजार जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ओसाका, टोकियो तसेच जपानच्या अनेक शहरांत कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. याचे परिणाम ओसाकातील ज्योतीच्या प्रवासातही दिसले. ज्योत वाहून नेण्यासाठी निवड झालेले खास बसने पार्कमध्ये आले. त्यांच्याकडे नेहमीपेक्षा खूप कमी वेळाकरिता ज्योत देण्यात आली.
ऑलिंपिक ज्योतीसह असलेले सुरक्षा रक्षकच ज्योत असलेल्या धावकाव्यतिरिक्त दिसत होते. एका वर्षावर लांबणीवर पडलेल्या ऑलिंपिक संयोजनाचा खर्च कमी करण्यासाठी ज्योतीचा जपानमधील प्रवास रद्द करण्याची मागणी झाली होती, पण ऑलिंपिक पुरस्कर्त्यांना या रिलेचा फायदा होत असल्याने ही संकल्पना मागे पडली.

ज्योतीच्या प्रवासाला विरोध
जपानमधील केवळ १३.२ टक्के लोकांनी ऑलिंपिक ज्योतीचा प्रवास सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. सर्वेक्षणातील ४९.३ टक्के लोकांनी ज्योतीचा प्रवास कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर नसलेल्या शहरातून नेण्याची सूचना केली आहे, त्याच वेळी ३५.९ टक्के जणांनी ज्योतीचा प्रवास रद्द करण्यास सांगितले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या