महाराष्ट्राचा रोहन कांबळे जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

नैरोबी येथील कासारानी स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या ४०० मीटर हर्डल्स शर्यतीत महाराष्ट्राचा असलेल्या रोहन कांबळेने उपांत्य फेरीत स्थान मिळवताना प्राथमिक फेरीत ५५ सेकंदात शर्यत पूर्ण केली.

नैरोबी - येथील कासारानी स्टेडियमवर सुरू असलेल्या जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या ४०० मीटर हर्डल्स शर्यतीत महाराष्ट्राचा असलेल्या रोहन कांबळेने उपांत्य फेरीत स्थान मिळवताना प्राथमिक फेरीत ५५ सेकंदात शर्यत पूर्ण केली.

कोल्हापूरचा असलेल्या रोहनला प्राथमिक फेरीत चौथे स्थान मिळाले. त्याची उपांत्य फेरीची शर्यत २१ तारखेला स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता होईल. यापूर्वी २०१६ च्या स्पर्धेत भारताच्या टी. संतोष कुमारने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिसरे स्थान मिळाल्याने तो अंतिम फेरी गाठू शकला नव्हता.

दरम्यान, मुला-मुलींच्या आठशे मीटर शर्यतीत अनुक्रमे अनू कुमार आणि पूजा यांना उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यात अपयश आले. अनू कुमार प्राथमिक फेरीत चौथ्या स्थानी (१ मि.५०.२६ सेकंद) आला; तर पूजाला प्राथमिक फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने २ मिनिटे १०.६६ सेकंद अशी वेळ दिली. मुलांच्या भालाफेकीत कुंवर अजयसिंग राणा आणि जयकुमार यांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले. अजयने ७१.०५ मीटर अंतरावर भाला फेकला; तर जयकुमारने ७०.३४ मीटर अंतरावर भाला भिरकाविला.

दुसऱ्या दिवशी पावसामुळे दुपारच्या सत्रातील इव्हेंट थांबवण्यात आले. मुलींच्या भालाफेकीला सुरुवात झाल्यावर दोन फेकी झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे स्पर्धा थांबवण्यात आली. पावसामुळे आज दुपारी होणारा मुलांचा पोल व्हॉल्ट आणि मुलींचा थाळीफेकीचा इव्हेंट उद्या सकाळच्या सत्रात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांच्या गोळाफेकीची अंतिम फेरी दुपारच्या सत्रात असली, तरी त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. 

शिरसेची शर्यत आज
भारतीय संघात रोहन कांबळेशिवाय तेजस शिरसे हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू आहे. औरंगाबादचा असलेला तेजस मुलांच्या ११० मीटर हर्डल्स शर्यतीत सहभागी होत असून त्याची प्राथमिक फेरी उद्या, शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार १०.०९ मिनिटांनी आहे.


​ ​

संबंधित बातम्या