मेरी कोम, मनप्रीत भारतीय पथकाचे ध्वजधारक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 July 2021

सहा वेळा जागतिक विजेतेपद जिंकलेली बॉक्सर मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद््घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजधारक असतील. समारोप सोहळ्यात हाच मान आघाडीचा कुस्तीगीर बजरंग पुनियास देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - सहा वेळा जागतिक विजेतेपद जिंकलेली बॉक्सर मेरी कोम आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद््घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजधारक असतील. समारोप सोहळ्यात हाच मान आघाडीचा कुस्तीगीर बजरंग पुनियास देण्यात आला आहे. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी याबाबतची घोषणा केली. त्यांनी भारतीय पथकात १२६ क्रीडापटू, तसेच ७५ पदाधिकारी असतील. त्यामुळे भारताचे एकंदर पथक २०१ सदस्यांचे असेल. या पथकात ५६ टक्के पुरुष सदस्य आहेत. 

दरम्यान, भारतीय एकंदर ८५ पदकांसाठी प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले. 

भारताची ध्वजधारक झाल्यामुळे मेरी कोम खूष आहे. ती म्हणाली, ही माझी नक्कीच अखेरची ऑलिंपिक स्पर्धा असेल. या स्पर्धेत मला हा बहुमान मिळत आहे, त्यामुळे असलेल्या भावना शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. अर्थात अनेकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत. त्याचेही दडपण असेल. अर्थात दडपणास सामोरे जाण्यास मी शिकली आहे, असे मेरी कोमने सांगितले. 

मनप्रीत हा भारतीय पथकाचा नेतृत्व करणारा सहावा हॉकीपटू आहे. यापूर्वी लालशाह बोखारी (१९३२), मेजर ध्यानचंद (१९३६), बलबीर सिंग थोरले (१९५२ तसेच १९५६), झफर इक्बाल (१९८४) आणि परगत सिंग (१९९६) यांना हा मान लाभला आहे. 

मेरी कोमच्या कामगिरीने कायम मला प्रेरित केले आहे. तिच्यासह ध्वजधारक होण्याचा मान मला मिळत आहे, हा माझा मोठा बहुमान आहे. मी ध्वजधारक होणे हा भारतीय हॉकीचाही गौरव आहे, असे मनप्रीतने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या