मेरीचा ‘पराजित’ आनंद; लढत जिंकल्याचे समजून सुरू केला जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 July 2021

मेरी कोम ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत इनग्रित व्हॅलेन्सियाविरुद्ध पराजित झाल्याचा कौल पंचांनी दिला, पण त्यानंतरही मेरी कोम रिंग सोडताना आपणच जिंकलो, असे समजत होती. त्यामुळेच तिने निकाल जाहीर झाल्यानंतर स्मितहास्य केले, तसेच जिंकल्याचा आनंदही व्यक्त करत दोन हात वर केले.

टोकियो / मुंबई - मेरी कोम ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत इनग्रित व्हॅलेन्सियाविरुद्ध पराजित झाल्याचा कौल पंचांनी दिला, पण त्यानंतरही मेरी कोम रिंग सोडताना आपणच जिंकलो, असे समजत होती. त्यामुळेच तिने निकाल जाहीर झाल्यानंतर स्मितहास्य केले, तसेच जिंकल्याचा आनंदही व्यक्त करत दोन हात वर केले.

सामन्यातील पाच पंचांनी मेरी कोमने तीनपैकी दोन फेऱ्या जिंकल्याचा कौल दिला, पण पहिल्या फेरीत तिच्याविरोधात एकतर्फी कौल होता, त्यामुळे ती पराजित झाली. कोरोनामुळे रेफरी पूर्वीप्रमाणे विजेत्या खेळाडूचा हात वर करीत नाहीत. ते डावीकडील खेळाडू जिंकला असल्यास त्या बाजूचा हात वर करतात. पंचांनी मेरीच्या बाजूचा हात वर केला नाही, तरीही मेरीला आपणच जिंकलो असे वाटत होते.

रिंगमध्ये होते, त्यावेळी मीच जिंकले असे वाटत होते, त्यामुळे खूष होते. रिंगबाहेर पडल्यानंतरही हीच भावना होती. उत्तेजक चाचणीस जात असताना मला किरेन रिजीजू यांचे ट्विट वाचून मी हरल्याचे समजले. त्याचसुमारास मार्गदर्शक छोटे लाल यादव यांनी मी हरल्याचे सांगितले, असे मेरीने सांगितले. 

या सर्व निर्णयाचा आढावा घेतला जाण्यासाठी काही पर्याय नाही किंवा याबाबत निषेधही नोंदविता येत नाही. या लढतीत नेमके काय घडले हे सगळ्या जगाने पाहिले आहे. त्यांनी खूप काही केले आहे. मी दुसऱ्या फेरीत एकतर्फी वर्चस्व गाजविले होते, तरीही त्यांनी ३-२ असा निकाल कसा दिला. जे काही निर्णय दिले जात आहेत, ते अनाकलनीय आहेत, अशी टीका मेरीने केली.

मी हरलेच कशी?
मेरीने या निर्णयाकरीता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बॉक्सिंग कृती दलास जबाबदार धरले. मेरी कोमही याचा भाग आहे. मी कशी हरले तेच मला कळले नाही. कृती दल काय करीत आहे?आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती काय करीत आहे? अशी विचारणा तिने केली. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बॉक्सिंग कृती दलाने टोकियोतील निर्णय जास्त पारदर्शक असतील, असे सांगितले होते. रिओ स्पर्धेतील निर्णयावर टीका झाल्याने ऑलिंपिक समितीने बॉक्सिंग संघटनेस संयोजनातून बाहेर केले होते.

सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत
ऑलिंपिक पात्रता मिळवलेला पहिला हेवीवेट बॉक्सर ठरलेल्या सतीश कुमारने ९१ किलोपेक्षा जास्तगटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊन याच्याविरुद्ध ४-१ असा कौल मिळवला. आशियाई स्पर्धेत दोनदा ब्राँझ जिंकलेल्या सतीषचा या लढतीच्या दरम्यान कपाळाला, तसेच गालाला जखमही झाली, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत ताकदवान ठोसे दिले. डोक्याला डोके लागल्याने सतीषला जखम झाली. सतीषने ठरल्यानुसार प्रतिस्पर्ध्यास आपल्यापासून दूर ठेवत बाजी मारली. सतीश पुढील प्रतिस्पर्धी जागतिक विजेता आहे. त्याला हरवणे अशक्य नाही. इंडिया ओपनमध्ये सतीषने त्याचा कस पाहिला होता.


​ ​

संबंधित बातम्या