‘माऊंट अन्नपूर्णा’ कॉलिंग - अडथळ्यांवर मात करत मोहीम
वर्षभर कोरोनाच्या संकटाशी झुंजून, त्यातून मार्ग काढत 2021 च्या हंगामात अन्नपूर्णा मोहीम आयोजित करण्यासाठी पुन्हा एकदा सूत्रे हलवली.
गिरिप्रेमीच्या कांचनजुंगा 2019 मोहिमेच्या दमदार यशानंतर अष्टहजारी शिखरमालिकेची घोडदौड अखंडित सुरू ठेवण्यासाठी ‘माऊंट अन्नपूर्णा’ या 8011 मीटर उंच असलेल्या जगातील दहाव्या उंच शिखरावर मोहीम आयोजित केली. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 च्या मार्च-एप्रिल महिन्यातच ही मोहीम होणार होती. मोहिमेचे सामान, चढाईची उपकरणं इतकंच काय तर सदस्यांचं काही वैयक्तिक सामानदेखील काठमांडूमध्ये पोहचलं होतं. 14 मार्च 2020 ला संघ काठमांडू निघणार होता. मात्र, त्याच सुमारास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने 12 मार्च 2020 रोजी भारताच्या सीमा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बंद करण्यात आल्या. दुसऱ्याच दिवशी नेपाळनंदेखील भारताचं अनुकरण करत आपल्या सीमा बंद केल्या. त्यामुळे गिरिप्रेमीची ‘अन्नपूर्णा 2020’ मोहीम स्थगित करावी लागली.
वर्षभर कोरोनाच्या संकटाशी झुंजून, त्यातून मार्ग काढत 2021 च्या हंगामात अन्नपूर्णा मोहीम आयोजित करण्यासाठी पुन्हा एकदा सूत्रे हलवली. काठमांडूला जाऊन सगळी जुळवाजुळव करून आलो अन जेमतेम 15 दिवसात मोहीम पुन्हा उभी राहिली. एक वर्षाचा प्रवास इतका सोपं नव्हता. सर्वांच्याच मानसिकतेत आणि शारीरिक तयारीत देखील नक्कीच फरक पडला होता. इतकंच काय मोहिमेच्या संघात देखील एक खूप मोठा बदल करावा लागला. पाच अष्टहजारी शिखरं गाठणारा आघाडीचा गिर्यारोहक आशिष मानेला वैयक्तिक कारणामुळे मोहिमेतून माघार घ्यावी लागली. अन्नपूर्णा सारख्या अवघड शिखर मोहिमेत इतक्या शेवटच्या क्षणी सहभागी होऊ शकेल, असा तयारीचा गिर्यारोहक कोण हा प्रश्न डॉक्टर सुमित मांदळे यांनी सोडवला. मोहिमेतील पहिला अडथळा दूर झाला. आशिष मोहिमेत नसल्याचं वाईट वाटत होतं पण सुमित संघात आल्यानं एक गिर्यारोहक व डॉक्टर संघाला मिळणं ही जमेची बाजू होती. अखेर भूषण हर्षे, जितेंद्र गवारे, सुमित आणि मी असा आमचा संघ पक्का झाला.
एक वर्षानी पुन्हा त्याच दिवशी 14 मार्च रोजी आम्ही पुण्याहून निघालो. आमच्या संघातील जितेंद्रला मात्र काही कौटुंबिक कारणामुळे आणखी काही दिवस पुण्यात थांबावं लागणार होतं. पुन्हा एकदा अनिश्चिततेतच आम्ही तिघे पुण्यातून निघालो. काठमांडु मध्ये पोहोचताच आणखी एक आव्हान आमची वाट बघत होते. सात दिवस विलगीकरण आणि त्यानंतर पुन्हा कोविड तपासणी करून ती निगेटिव्ह आली तरच आम्हाला चढाईचा परवाना मिळू शकणार होता. त्यामुळे आमचं अनुकूलतेचं गणित बिघडलं. आम्ही ठरवलेली आठ दिवसांची ‘चुलू फार इस्ट’ या 6000 मीटर उंच शिखराची मोहीम रद्द करावी लागली. ठरल्याप्रमाणे सात दिवसांनी म्हणजे 21 मार्च रोजी RT_PCR चाचणी केली. चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच चढाईचा परवाना मिळवला आणि आमचा अन्नपूर्णा शिखर चढाईचा मार्ग खुला झाला.