नीरज चोप्रास सुवर्ण; पण कामगिरी निष्प्रभ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 June 2021

नीरज चोप्राने कार्लस्ताद ग्रांप्रि अॅथलेटिक्स स्पर्धा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, पण त्याची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. स्वीडनमधील ही स्पर्धा ब्राँझ मालिकेतील स्पर्धा होती.

नवी दिल्ली - नीरज चोप्राने कार्लस्ताद ग्रांप्रि अॅथलेटिक्स स्पर्धा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, पण त्याची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. स्वीडनमधील ही स्पर्धा ब्राँझ मालिकेतील स्पर्धा होती. 

नीरजने गतवर्षी मार्चमध्ये पतियाळात ८८.०७ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे, पण तो स्वीडनमधील स्पर्धेत जेमतेम ८० मीटरपर्यंतच फेक करू शकला. त्याने या स्पर्धेतील सर्वोत्तम फेक दुसऱ्या प्रयत्नात नोंदवताना ८०.९६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्याचे तीन प्रयत्न फाऊल ठरले, तसेच सहाव्या प्रयत्नात त्याला ७७.४८ मीटर हीच कामगिरी करता आली. त्याने काही दिवसांपूर्वी लिस्बन स्पर्धेत ८३.१८ मीटर ही कामगिरी केली होती. आता तो फिनलंडमधील स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत नीरजला फारसे आव्हान नव्हते.

स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांवर नजर टाकल्यावर तो सहज जिंकणार असेच वाटत होते. स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्याची कामगिरी नीरजपेक्षा साडेचार मीटरने कमी होती. ही स्पर्धा झाली, त्यावेळी तपमान जेमतेम १३ अंश होते. तसेच पाऊस होता आणि वारेही वाहत होते. ही भालाफेकीच्या स्पर्धेसाठी खूपच आव्हानात्मक परिस्थिती होती.


​ ​

संबंधित बातम्या