नीरज चोप्राचा भाला आता सुवर्णपदकाच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 August 2021

ऑलिंपिक ॲथलेटिक्समध्ये भारताच्या पहिल्या पदकाच्या अपेक्षांचे ओझे घेऊन खेळणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने देशवासीयांना पात्रता फेरीत मोठा दिलासा दिला. २३ वर्षीय नीरजने भालाफेकीत पहिल्याच प्रयत्नात पात्रता अंतर पार केले आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. आता त्याचे सुवर्णपदक हेच लक्ष्य आहे.

टोकियो - ऑलिंपिक ॲथलेटिक्समध्ये भारताच्या पहिल्या पदकाच्या अपेक्षांचे ओझे घेऊन खेळणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने देशवासीयांना पात्रता फेरीत मोठा दिलासा दिला. २३ वर्षीय नीरजने भालाफेकीत पहिल्याच प्रयत्नात पात्रता अंतर पार केले आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. आता त्याचे सुवर्णपदक हेच लक्ष्य आहे. 

पाच वर्षांपूर्वी ज्युनिअर विश्व स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. तेव्हापासूनच त्याच्याकडून ऑलिंपिकमध्ये पदकांची अपेक्षा करण्यात येऊ लागली होती. ही अपेक्षा तो पूर्ण करतो का, हे येत्या ७ तारखेला कळेल. सहभागी झालेल्या भालाफेकपटूंची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. नीरज पहिल्या गटात होता.

अंतिम फेरीची थेट पात्रता गाठण्यासाठी ८३.५० मीटर अंतर निर्धारित करण्यात आले होते. नीरजने पहिल्याच प्रयत्नात भन्नाट फेक केली. भाला हवेत गेला आणि थेट ८६.६५ मीटर अंतरावरच पडला. अंतिम फेरी निश्चित झाल्याने नीरजने पुढे प्रयत्नच केला नाही. नीरजला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आणि जागतिक ॲथलेटिक्सचे कार्यकारिणी सदस्य आदिल सुमारीवाला आवर्जून उपस्थित होते. 

आर्मीत कार्यरत असलेला नीरज स्पर्धा संपल्यावर म्हणाला, वॉर्मअप करताना भाला फेकून पाहिला. मात्र, मनासारखी कामगिरी होत नव्हती. मात्र, पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात भाल्याला चांगला अँगल (दिशा) मिळाला आणि त्यामुळे अपेक्षित अंतर गाठता आले.

यंदा ८८.०७ मीटरचा राष्ट्रीय विक्रम केल्यावर तो जागतिक टॉप लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आला होता. मात्र, गेल्या महिन्यात तो चौथ्या स्थानावर होता. आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजला दुखापतीमुळे दोन वर्षांपूर्वी दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत खेळता आले नव्हते. 

नीरज चांगला खेळाडू असला, तरी तो मला पराभूत करू शकत नाही, असे वक्तव्य करणारा जर्मनीचा जोहान्न्स वेट्टर ८५.६४ मीटरसह दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या मोसमात वेट्टरने ८९-९० मीटर असेच सातत्य ठेवले आहे. 

पाकिस्तानचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता अर्शद नदीम ८५.१६ मीटरसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑलिंपिक ॲथलेटिक्समध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला पाकिस्तानी ॲथलिट ठरला. 

महत्त्वाचे 

  • अंतिम फेरीत प्रवेश करणारा नीरज एकूण १२ वा भारतीय व पहिलाच भालाफेकपटू. 
  • यापूर्वी भालाफेकीत सर्वोत्तम कामगिरी गुरतेजसिंगची. १९८४ च्या स्पर्धेत २५ वे. 

पहिल्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचा आनंद वेगळाच आहे. यासाठी मी खूप मेहनत केली असून आता सर्व लक्ष अंतिम फेरीवर केंद्रित केले आहे.  देशासाठी नक्की पदक जिंकेन, असा मला विश्वास आहे.
- नीरज चोप्रा


​ ​

संबंधित बातम्या