भारतीय सेलर्सनी इतिहास घडवला; नेत्राच्या नावेही खास विक्रम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 April 2021

 ऑलिंपिक क्रीडा सेलिंग इतिहासात प्रथमच भारतीयांनी पात्रता साध्य केली आहे.

मुंबई : ऑलिंपिक क्रीडा सेलिंग इतिहासात प्रथमच भारतीयांनी पात्रता साध्य केली आहे. ओमानला झालेल्या पात्रता स्पर्धेद्वारे तीन प्रकारात चार भारतीय आपले कसब पणास लावतील. मुसानाह स्पर्धेद्वारे नेत्रा कुमारनने ऑलिंपिक सेलिंग स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला हा मान मिळवला. तिने लेसर रेडियल गटात ही कामगिरी केली. विष्णू सर्वानन हा लेसर स्टँडर्ड गटात सहभागी होईल, तर केसी गणपती - वरुण ठक्करने 49 ईआर प्रकारात अव्वल येत टोकियोचे तिकीट पक्के केले.  

नेत्रा तसेच विष्णू असलेल्या गटातून दोघांना ऑलिंपिक पात्रता होती. नेत्रा स्पर्धेत थोडक्यात दुसरी आली. तिचे निव्वळ दोषांक 30 झाले, तर नेदरलँडसच्या एम्मा चार्लोतीचे 29. या स्पर्धेतून दोघींना पात्रता होतीच, पण ही पात्रता केवळ आशियाई स्पर्धकांसाठी होती, त्यामुळे पात्रतेत नेत्रा अव्वल आली. विष्णू अखेरच्या दिवसातील शर्यतीपूर्वी तिसरा होता, पण त्याने थायलंडच्या कीराती बुलाँग याला चार निव्वळ दोषांकांनी मागे टाकत पात्रता निश्चित केली. गणपती - वरुण जोडीने सर्वात प्रभावी कामगिरी केली. त्यांनी पंधरा शर्यतींच्या या स्पर्धेत हाँगकाँगच्या जोडीला दोन दोषांकांनी मागे टाकले. भारतीय जोडीचे 51 दोषांक झाले.

भारतीय सेलर्स पाचव्यांदा ऑलिंपिकमध्ये

फारोख तारापोर आणि ध्रुव भंडारी   1984 च्या बार्सिलोना ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत 470 गटात सहभागी झाले होते. त्यानंतर 1988 च्या स्र्धेत तारापोर आणि केली राव यांचा सहभाग होता. 1992 च्या स्पर्धेत तारापोर सायरस कामासह सहभागी झाला होता. त्यानंतर 2004 च्या स्पर्धेत मालव श्रॉफ आणि सुमीत पटेल हे 49 ईआर प्रकारात सहभागी झाले होते.  

ऑलिंपिक पात्रता साध्य करु शकतो हा आम्हाला विश्वास होता. कमालीचे दडपण असताना एकमेकांना साथ देत लक्ष्य कसे साधायचे हे आम्ही जाणून होतो. या स्पर्धेसाठी आल्यावर आम्ही आमच्या बोटीची जुळणी केली, त्यावरुन आम्ही केलेली पूर्वतयारी तुमच्या लक्षात येईल.
- के सी गणपती      

भारतीय सेलर्सनी इतिहास घडवला आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धांतील सहभाग पात्रतेद्वारे नव्हता. आपण पात्रतेतून यावेळी सहभाग निश्चित केला आहे. भारताचा प्रथमच तीन प्रकारात सहभाग असेल. चार भारतीय यापूर्वी कधीही सहभागी झाले नव्हते.
- कॅप्टन जितेंद्र दिक्षीत, भारतीय यॉटिंग संघटनेचे सचिव
 


​ ​

संबंधित बातम्या