Target_2021 : खेळाडू शेवटच्या श्वासापर्यंत 'हम होंगे कामयाब' याच जोमाने लढत राहतो

सकाळ स्पोर्टस्ट ऑनलाइन टीम
Friday, 1 January 2021

भाकीत म्हणाला, लॉकडाउनमधील एकेक दिवस सत्त्वपरीक्षा घेणारा होता. 'न भूतो ना भविष्यती' अशा पद्धतीचे कोरोना संकट देशात आले आणि खेळाडूंसह सर्वांचीच मोठी गोची झाली. कोरोनामुळे वर्षभर कोणत्याही स्पर्धा झाल्या नाही.

यवतमाळ :  कोरोनाचे संकट असो किंवा त्यापेक्षाही मोठे संकट असो, खरा खेळाडू अशा संकटाला न घाबरता तेवढ्याच हिंमतीने शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत ‘हम होंगे कामयाब' याच जोमाने लढत राहतो. लॉकडाउननंतर नव्या उत्साहाने लक्ष्य गाठण्यासाठी दृढ आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, संयम व कठोर परिश्रमाने नवीन ध्येय डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करू, असा विश्वास राष्ट्रीय सुवर्णपदकविजेता सॉफ्टबॉलपटू भाकीत मेश्राम याने व्यक्त केला आहे.

भाकीत म्हणाला, लॉकडाउनमधील एकेक दिवस सत्त्वपरीक्षा घेणारा होता. 'न भूतो ना भविष्यती' अशा पद्धतीचे कोरोना संकट देशात आले आणि खेळाडूंसह सर्वांचीच मोठी गोची झाली. कोरोनामुळे वर्षभर कोणत्याही स्पर्धा झाल्या नाही. त्याचप्रमाणे सरावालासुद्धा क्रीडांगण मिळाले नाही. याचा माझासह सर्वच खेळाडूंना प्रचंड त्रास झाला. लॉकडाउनकाळात फिटनेस व तांत्रिक खेळ व कौशल्य जोपासण्यासाठी घराच्या टेरेसवर नेट लावून सराव केला. त्यासाठी माझे आंतरराष्ट्रीय क्रीडामार्गदर्शक किशोर चौधरी यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे यु-ट्यूबच्या माध्यमातून नियमित वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाशी दोन हात करीत असताना वर्षे संपत आलं. मात्र, भविष्यातील स्पर्धांबाबत अजूनही अनिश्चितता आहे. 

Target_2021 : "झिरोपासून 'स्टार्ट' करावा लागणार नाही हे निश्चित"

भाकीतला नववर्षात ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा आहे. कारकिर्दीतील मागे पडलेले एक वर्षे भरून काढणे कठीण आहे, याची त्याला जाणीव आहे. या परिस्थितीतही आपले लक्ष्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम यश संपादन करणे आणि अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणे आहे, असे तो म्हणाला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशाला नावलौकिक मिळवून देण्याची त्याची इच्छा आहे. लक्ष्य गाठण्यासाठी नियमित सरावासह कणखर मानसिकतेची गरज असल्याचे तो मानतो. कारण स्पर्धा झाल्या तरी कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे लक्ष्य गाठण्याचे आव्हान असताना कोरोनाचाही सामना करावा लागणार, याची मला जाणीव आहे. आणि यात मी यशस्वी होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

भाकीतचे वडील उमेश खाजगी व्यवसाय करतात, तर आई संगीता गृहिणी आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अमोलकचंद महाविद्यालयात असताना भाकीतने पीयूष चांदेकर, पंकज शेलोटकर व आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनात सरावाला सुरुवात केली. औरंगाबाद येथे २०१९-२० मध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत १९ वर्षेवयोगटात सुवर्णपदक पटकावून स्पर्धेतील ‘बेस्ट हिटर'चा पुरस्कार जिंकला. तेलंगणा राज्यातील आरमोर येथील राष्ट्रीय ज्युनियर व हैदराबाद येथील राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावून त्याने यवतमाळ जिल्ह्याचा लौकिक वाढविला.

 शब्दांकन : राजकुमार भितकर


​ ​

संबंधित बातम्या