विश्रांती नाही, तयारी पुढच्या ऑलिंपिकची!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 August 2021

ऑलिंपिकमध्ये पदार्पणातच मिळवलेले पदक महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन प्रेरणादायी ठरले. टोकियो ऑलिंपिकमधील मोहीम पूर्ण झाली आहे. आता तीन वर्षांनी होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी नव्याने सुरुवात करायची आहे, असे मत लवलिनाने व्यक्त केले.

नवी दिल्ली - ऑलिंपिकमध्ये पदार्पणातच मिळवलेले पदक महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन प्रेरणादायी ठरले. टोकियो ऑलिंपिकमधील मोहीम पूर्ण झाली आहे. आता तीन वर्षांनी होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी नव्याने सुरुवात करायची आहे, असे मत लवलिनाने व्यक्त केले.

आसामच्या गोलाघट जिल्ह्यातील बारो मुखिया या छोट्या गावात जन्मलेली २३ वर्षीय लवलिना ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी तिसरी भारतीय बॉक्सर ठरली आहे. याअगोदर विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांनी ही कामगिरी केलेली आहे.

ऑलिंपिकमध्ये पात्रता मिळवणे आणि त्यानंतर आता पदकाचा वेध घेणे या प्रवासासाठी आपण अनेक गोष्टींचा त्याग केला असल्याचे लवलिनाने सांगितले. गेली आठ वर्षे मी घरापासून दूर आहे. माझे कुटुंबीय अडणीत असताना मी त्यांना मदत करू शकलेली नाही. दूरवरून मी त्यांच्याशी संपर्कात असते. माझ्यासाठी हा त्याग सर्वांत मोठा आहे. चटकदार आणि चमचमीत खाण्याच्या आवडीनिवडीही मला करता आलेल्या नाहीत. माझ्यासाठी असलेला डायट मला पाळावा लागतो. सरावापासूनही सुट्टी मिळत नाही. आठ वर्षे सराव सुरू आहे, असे लवलिना म्हणाली.


​ ​

संबंधित बातम्या