राष्ट्रीय क्रीडा संस्था कोरोनाचा हॉटस्पॉट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 April 2021

या केंद्रात सध्या असलेल्या 380 क्रीडापटू, मार्गदर्शकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात 26 जणांना बाधा झाली आहे. 

पतियाळा : पंजाबमधील वाढत्या कोरोनाची लागण आता पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा संस्थेपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेतील 30 क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे; मात्र ऑलिंपिकला पात्र ठरलेल्या एकाही क्रीडापटूस अद्याप बाधा  झालेली नाही, हा दिलासा आहे.  पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत वर्षभर देशातील आघाडीचे क्रीडापटू सराव करीत असतात. त्यात प्रामुख्याने बॉक्‍सिंग, वेटलिफ्टिंग आणि ॲथलेटिक्‍स या प्रकारातील खेळाडूंचा समावेश असतो. या केंद्रात सध्या असलेल्या 380 क्रीडापटू, मार्गदर्शकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात 26 जणांना बाधा झाली आहे. 

ऑलिंपिकपात्र खेळाडूंना बाधा झाली नसली, तरी भारतीय बॉक्‍सिंग संघाचे मुख्य मार्गदर्शक सी. ए. कुटप्पा तसेच गोळाफेकीचे मार्गदर्शक मोहिंदर सिंग धिल्लाँ यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  आम्ही कोरोना चाचणी घेताना कोणाचाही अपवाद केला नाही. त्यात खेळाडू, मार्गदर्शक, ट्रेनर यांचाही समावेश आहे. बाधित 26 पैकी दहा जण ॲथलेटिक्‍सशी संबंधित आहेत. त्यात ऑलिंपिकसाठी एकही पात्र खेळाडू नाही, हे त्यात समाधान. बाधित खेळाडू तसेच मार्गदर्शक तातडीने विलगीकरणात आले आहेत; तसेच संकुलाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

या क्रीडा संस्थेत असलेले वेटलिफ्टर एप्रिलमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पूर्वतयारी करीत आहेत. ही स्पर्धा ऑलिंपिक पात्रता मालिकेतील स्पर्धा आहे. एकाही वेटलिफ्टरला बाधा झालेली नाही, असे सांगण्यात आले. ऑलिंपिक पात्र खेळाडू बाधित नसले, तरी ही पात्रता साध्य करण्याची क्षमता असलेले खेळाडू बाधित आहेत. त्यात आशियाई उपविजेता दीपक कुमार तसेच इंडिया ओपन विजेता बॉक्‍सर संजीत यांचा समावेश आहे. एकंदर सात बॉक्‍सरना बाधा झाली असल्याचे समजते.

बंगळूर केंद्रातही लागण
    बंगळूरच्या क्रीडा प्राधीकरण केंद्रातील चार जणांना लागण
    बाधितांमध्ये चालण्याच्या स्पर्धेतील मार्गदर्शकांचा समावेश
    बंगळूरला 428 जणांची चाचणी
    पतियाळातील 26 बाधितांपैकी 16 खेळाडू, तर उर्वरीत सपोर्ट स्टाफ

प्रशिक्षण केंद्रात कोरोना बाधित आढळले असले तरी त्याचा या केंद्रातील ऑलिंपिकच्या पूर्वतयारीवर कोणताही परिणाम होणार नाही. बाधितांपैकी कोणीही गंभीर नाही. बाधा न झालेल्या खेळाडूंचा सराव सुरक्षित वातावरणात सुरु आहे.  - क्रीडा प्राधीकरणातील आधिकारी

राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील सर्वांचीच कोरोना चाचणी केली आहे. सध्या २६ जणांना बाधा झाली असल्याचे समजले आहे. काहींच्या चाचण्यांचे निकाल अद्याप बाकी आहेत. - राष्ट्रीय क्रीडा संस्थेतील अधिकारी

पॅरा बॅडमिंटन संघासही लागण

दुबईतील पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील एका खेळाडू; तसेच संघव्यवस्थापकांना कोरोनाची लागण झाली आहे; मात्र अन्य खेळाडूंना त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे खेळण्यास मंजुरी दिली असल्याचे वृत्त आहे. कोरोना महामारीमुळे ऑलिंपिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक कोलमडले आहे. दुबई स्पर्धेनंतर एकमेव पात्रता स्पर्धा होणार आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या