भालाफेकीत नीरज चोप्राकडून जगातील सर्वोत्तम कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 March 2021

जागतिक ॲथलेटिक्‍स महासंघाने नीरजच्या कामगिरीस मान्यता दिल्यास त्याच्या नावावर 2021 मधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली जाईल.

मुंबई : नीरज चोप्राने भारतीय ग्राप्रि ॲथलेटिक्‍स स्पर्धा मालिकेतील तिसऱ्या स्पर्धेत भालाफेकीत राष्ट्रीय विक्रमी कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने या वर्षातील जागतिक सर्वोत्तम कामगिरीही नोंदवली. नीरजने गतवर्षीच्या जानेवारीत ऑलिंपिक पात्रता कामगिरी नोंदवली होती. कोरोना महामारीमुळे स्पर्धांना फटका बसला आणि नीरजने आपला ब्रेक त्याहून लांबवला. पतियाळा येथील स्पर्धेत त्याने पाचव्या प्रयत्नात 88.07 मीटर अंतरावर भालाफेक करीत जाकार्तात नोंदवलेला 88.06 मीटरचा विक्रम मोडीत काढला.

जागतिक ॲथलेटिक्‍स महासंघाने नीरजच्या कामगिरीस मान्यता दिल्यास त्याच्या नावावर 2021 मधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली जाईल. सध्या या क्रमवारीत जर्मनीचा जोहान्नेस वेट्टर 87.25 मीटरसह अव्वल आहे. नीरजने त्याच्यापेक्षा पाऊण मीटर अंतर जास्त कामगिरी केली आहे. 

नीरजने या स्पर्धेत चारही वैध प्रयत्नात 80 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भालाफेक केली. पाचव्या प्रयत्नातील 88.07 मीटर व्यतिरिक्त त्याची कामगिरी 83.03, 83.36 आणि 82.24 मीटर होती. राष्ट्रीय विक्रम मोडला जाणार असल्याने पंचांनी किमान तीनदा अंतराची फेरतपासणी केली होती. दरम्यान, नीरजप्रमाणेच ऑलिंपिक पात्रता (85 मीटर) यापूर्वीच नोंदवलेला शिवपाल सिंग (81.63) दुसरा तर सहिल सिल्वाल (80.65) तिसरा आला.


​ ​

संबंधित बातम्या