ऑलिंपिक उद्घाटन सोहळा प्रेक्षकांविना?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना होण्याची वेळ टाळण्यासाठी जपान विविध पर्यांयांचा विचार करीत आहे. मात्र तरीही उद्घाटन तसेच समारोप सोहळाही प्रेक्षकांविना होण्याची शक्यता आहे.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना होण्याची वेळ टाळण्यासाठी जपान विविध पर्यांयांचा विचार करीत आहे. मात्र तरीही उद्घाटन तसेच समारोप सोहळाही प्रेक्षकांविना होण्याची शक्यता आहे. 

जपानमध्ये कोरोना महामारी पसरू नये यासाठी दहाऐवजी पाच हजार प्रेक्षकांचीच मर्यादा असेल, तसेच रात्री नऊनंतर संपणार असलेल्या स्पर्धा, तसेच कार्यक्रम प्रेक्षकांविना घेण्याबाबत एकमत झाले आहे. स्पर्धेच्या उद््घाटन तसेच समारोप सोहळ्यासह प्रेक्षक गर्दी करणार असलेल्या अॅथलेटिक्समधील महत्त्वाच्या स्पर्धा शर्यती, बेसबॉल, फुटबॉलच्या महत्त्वाच्या लढती प्रेक्षकांविनाच होऊ शकतील. ऑलिंपिकमधील किमान ४० टक्के स्पर्धा, तसेच कार्यक्रम प्रेक्षकांविना होण्याची शक्यता आहे. 

टोकियोतील कोरोना रुग्ण वाढत असल्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमी आहे. प्रेक्षक मर्यादाही दहावरून पाच हजार होईल. यामुळे  स्पर्धा, शर्यतींच्या ७५० सत्रांपैकी ३०० प्रेक्षकांविना होतील. ऑलिंपिकमुळे कोरोनाचा फैलाव झाला, अशी टीका टाळण्यासाठीच कठोर उपाय होत आहेत.

सर्बिया संघातील स्पर्धकास कोरोना
टोकियोत दाखल होताच सर्बियाच्या रोईंग संघातील एका स्पर्धकास कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते. गेल्या महिन्यात युगांडा संघातील दोघे कोरोना चाचणीत पॉझिटिव आढळले होते. सर्बियाचा रोईंग संघ पाच सदस्यांचा आहे. त्यातील एक बाधित आढळल्याने संघातील अन्य सदस्यांचे दोन आठवड्यांसाठी विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे त्यांना स्पर्धेपूर्वी सराव करता येणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या