ऑलिंपिकभोवती कोरोनाचा फेरा; तीन क्रीडापटू कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 July 2021

ऑलिंपिक रिंगभोवतालचा कोरोनाचा फेरा वाढत आहे. आतापर्यंत तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील दोघांचा मुक्काम क्रीडा नगरीत आहे. यामुळे स्पर्धा कालावधीत कोरोनाची चिंता वाढली आहे.

टोकियो - ऑलिंपिक रिंगभोवतालचा कोरोनाचा फेरा वाढत आहे. आतापर्यंत तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील दोघांचा मुक्काम क्रीडा नगरीत आहे. यामुळे स्पर्धा कालावधीत कोरोनाची चिंता वाढली आहे.

बाधित खेळाडूंची माहिती देण्यास संयोजकांनी नकार दिला आहे. दोघे क्रीडानगरीत आहेत, तर एक जण संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये आहे, एवढेच संयोजकांनी सांगितले आहे. जपानमधील माध्यमांनुसार क्रीडानगरीत पहिल्यांदा बाधित असलेल्या व्यक्ती ज्या देशाच्या आहे, त्याच देशाचे हे खेळाडू आहेत. त्या देशाच्या सर्व खेळाडूंना सध्या आपल्या खोल्या न सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. स्पर्धेतील त्यांच्या सहभागाबाबतही संयोजकांनी टिपणी करणे टाळले. 

खेळाडूंना स्पर्धेपूर्वी पाचच दिवस क्रीडानगरीत येण्यास सांगितले आहे. मात्र विविध संघाच्या आगमनानुसार त्यास अपवाद करण्यात येत आहे. मात्र, क्रीडानगरीतील प्रत्येकासाठी दैनंदिन चाचणी सक्तीची आहे. क्रीडानगरीतील प्रत्येकास सकाळी नऊ अथवा संध्याकाळी सहा वाजता चाचणीसाठी नमुना देण्यास सांगितला आहे. या चाचणीचा अहवाल १२ तासांत मिळेल, असेही सांगितले आहे. 

खेळाडूच केवळ कोरोनाबाधित नाहीत. त्याचबरोबर एक कंत्राटदार, एक पत्रकार यासह खेळाशी संबंधित पाच व्यक्ती बाधित आहेत. स्पर्धेशी संबंधित बाधित आता ५५ झाले आहेत, असे संयोजन समितीची आकडेवारी सांगते. 
क्रीडानगरीत बाधित झालेल्या खेळाडूंना अन्यत्र हलविण्याबाबत संयोजकांनी काही सांगितले नाही, मात्र खेळाशी संबंधित नसलेल्या बाधित व्यक्तीस अन्यत्र हलविले असल्याचे सांगण्यात आले. 

दोन फुटबॉलपटू बाधित
आपल्या संघातील दोन खेळाडूंसह तिघे बाधित असल्याचे दक्षिण आफ्रिका फुटबॉल संघाने जाहीर केले. दोन खेळाडूंना ताप आला होता. ते चाचणीत बाधित आढळले आहेत. संघ सध्या विलगीकरणात आहे. रविवारी झालेल्या सर्व खेळाडूंच्या चाचणीनंतरच संघाच्या सरावाबाबत निर्णय होईल. दक्षिण आफ्रिका संघाची गटात मेक्सिको आणि फ्रान्सविरुद्ध लढत होणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघ विलगीकरणात
केर्न्स - ऑस्ट्रेलियाचा अॅथलेटिक्स संघ विलगीकरणात आहे. संघासोबत असलेले पदाधिकारी चाचणीत बाधित आढळल्याने हा निर्णय झाला. ते फेरचाचणीत निगेटिव्ह आढळल्याचे सांगण्यात येते. कोरोना स्वतःहून पसरत नाही, त्यासाठी कोणी तरी माध्यम होत असते. आता कोणाच्या संपर्कातच आले नाही, तर कोरोना होणार नाही, सध्या आम्ही हेच करीत आहोत, असे अॅथलेटिक्स ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या