लसीकरण पूर्ण केलेल्या भारतीय खेळाडूंनाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 June 2021

लसीकरण पूर्ण केलेल्या भारतीय खेळाडूंनाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये प्रवेश देण्यात येईल, असे ऑलिंपिक संयोजन समितीचे सीईओ तोशिरो मुतो यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारत, ब्रिटनसह दहा देशांना ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश नाकारणार असल्याच्या वृत्ताचे त्यांनी पूर्णपणे खंडन केले.

टोकियो - लसीकरण पूर्ण केलेल्या भारतीय खेळाडूंनाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये प्रवेश देण्यात येईल, असे ऑलिंपिक संयोजन समितीचे सीईओ तोशिरो मुतो यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारत, ब्रिटनसह दहा देशांना ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश नाकारणार असल्याच्या वृत्ताचे त्यांनी पूर्णपणे खंडन केले.

भारत, मलेशिया, ब्रिटनसह दहा देशातील क्रीडापटूंना ऑलिंपिकमध्ये प्रवेश नाकारण्याची सूचना जपान सरकारने ऑलिंपिक संयोजन समितीस केल्याचे वृत्त मलेशियातील वर्तमानपत्राने दिले होते. यात कोणतेही तथ्य नाही, याच प्रकारची बातमी दोन आठवड्यांपूर्वी आली होती. त्यात कोणतेही सत्य नाही, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले होते.

संयोजन समितीनेही त्यात तथ्य नसल्याचे सांगितले. काही देशात कोरोनाचे वाढते रुग्ण आहेत किंवा तिथे कोरोनाचे नवे प्रकार आढळत आहेत. त्यामुळे त्या देशांना ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्याचे काहीच कारण नाही. या प्रकारची चर्चाही कधी झालेली नाही, असे मुतो यांनी सांगितले.

भारतात कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे, त्याची नक्कीच चिंता आहे. त्याचमुळे जपानमध्ये स्पर्धेस येण्यापूर्वी सर्वांना लसीकरण करून घेण्याची सूचना दिली आहे. आम्ही याबाबतची घोषणा यापूर्वीच केली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि त्यासारख्या अन्य देशांसाठी हे सक्तीचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

म्हणे स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी
मलेशियातील वर्तमानपत्राने काही देशांना स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचे कारण देऊन स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा पर्याय समोर आणण्यात येईल, असेही म्हटले आहे. या वृत्तानुसार भारत, ब्रिटनसह मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, अफगाणिस्तान, व्हिएतनाम यांना प्रवेश नाकारण्याचे ठरले होते.  

यापूर्वीच कठोर निर्बंध
जपानने १५९ देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध घातले आहेत. त्यांना प्रवेश नाकारण्याचेच ठरले आहे. अन्य देशातून येणाऱ्यांसाठी चौदा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे आहे. प्रवेशापूर्वी त्यांच्यासाठी कोरोना चाचणीही बंधनकारक आहे. त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्यास मनाई आहे.


​ ​

संबंधित बातम्या