अन्यथा खेळावरूनही समाजात भेद - थॉमस बॅश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 July 2021

खेळापासून राजकारण दूर ठेवायला हवे, अन्यथा खेळावरूनही समाजात भेद पडण्यास सुरुवात होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बॅश यांनी केले. जे प्रश्न राजकारणातून सुटत नाहीत, ते ऑलिंपिक चळवळीद्वारे सुटतील, असे मानणेही चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

जीनिव्हा - खेळापासून राजकारण दूर ठेवायला हवे, अन्यथा खेळावरूनही समाजात भेद पडण्यास सुरुवात होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बॅश यांनी केले. जे प्रश्न राजकारणातून सुटत नाहीत, ते ऑलिंपिक चळवळीद्वारे सुटतील, असे मानणेही चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

शांतीपू्र्ण वातावरणात सर्व जग एकत्र येणारा एकमेव सोहळा म्हणजे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक जण समाविष्ट असतो. एकात्मतेची भावना असते. त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांपासून राजकारण दूर असण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढील वर्षी चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. चीन मानवी हक्कांचे उल्लंघन करीत असल्याने या स्पर्धेवर बहिष्काराची मागणी होत आहे. याकडे लक्ष वेधत बॅश म्हणाले, कोणत्याही स्वतंत्र देशाच्या कायद्यात बदल करण्याची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीस क्षमता नाही किंवा आधिकारही नाही. ऑलिंपिक स्पर्धेच्यावेळी सर्वांना समान हक्क असतात. त्यावेळी माध्यम स्वातंत्र्य, कामगार हक्क याकडे लक्ष दिले जाते. अर्थात याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला राजकीय नेत्यांचे पाठबळ हवे आहे, अन्यथा ऑलिंपिक स्पर्धेवरून समाजात फूट पा़डली जाईल, असेही ते म्हणाले. 

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना स्पर्धेनंतर किंवा स्पर्धेपूर्वी आपली मते मांडता येतील, पण त्यांना पदकमंचावर असताना कोणतीही टिप्पणी करता येणार नाही. मात्र खेळाडूंना कोणत्याही देशाचा, संघटनेचा निषेध करता येणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या