Pro Kabaddi League 2021 : प्रो-कबड्डीसाठी जुलैचा मुहुर्त?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 March 2021

प्रो-कबड्डी लीगच्या स्वरूपात सध्या तरी बदल करण्याचा विचार नाही. स्पर्धेच्या ठिकाणांबाबतचा अंतिम निर्णय घेताना मीडिया पार्टनरचे मत विचारात घेण्यात येईल.

मुंबई : प्रो-कबड्डीच्या आगामी मोसमास जुलैत सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. कोरोना महामारीमुळे सर्व स्पर्धा थांबल्यावर बंदिस्त स्टेडियममध्ये होणारी प्रो-कबड्डी लीग ही देशातील पहिली लीग असण्याची शक्‍यता आहे.  आम्ही प्रो-कबड्डी लीगचा आठवा मोसम देशातील कबड्डीच्या ऑफ सीझनमध्ये घेण्याचा विचार करीत आहोत. अर्थातच हा कालावधी जून ते ऑक्‍टोबर आहे. लीगच्या कार्यक्रमाबाबत आम्ही नव्या मीडिया पार्टनरसह नक्कीच चर्चा करणार आहोत. सध्या तरी आम्ही जूनच्या अखेरीस अथवा जुलैच्या सुरुवातीस लीग घेण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करीत आहोत, असे लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.

प्रो-कबड्डी लीगच्या स्वरूपात सध्या तरी बदल करण्याचा विचार नाही. स्पर्धेच्या ठिकाणांबाबतचा अंतिम निर्णय घेताना मीडिया पार्टनरचे मत विचारात घेण्यात येईल. ही लीग ९३ सामन्यांची असेल. कोरोना महामारीमुळे खेळाडूंचे विलगीकरण आवश्‍यक असेल. त्यामुळे लीगचा कालावधी लांबण्याची शक्‍यता आहे. मात्र त्यानंतरही सामन्यांची संख्या किंवा त्याच्या स्वरूपात कोणताही बदल होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

INDvsENG : वॉशिंग्टन-बेयरस्ट्रोचा फाइटिंग सीन (VIDEO)

सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच आम्ही लीग घेणार आहोत, असे सांगताना गोस्वामी यांनी फ्यूचर कबड्डी हिरोज कार्यक्रमही होणार आहे. त्यात भारतातील अव्वल मार्गदर्शक पंधरा राज्यांत जाऊन नवोदित खेळाडूंचा शोध घेतात. त्यांना लिलावात ‘ड’ गटात स्थान देण्यात येते. हा कार्यक्रम आगामी दीड महिन्यात सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या