पुण्याच्या जितेंद्र गवारेची एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 May 2021

पुण्याच्या जितेंद्र गवारे याने जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर केले. गिरिप्रेमी जितेंद्रने आज बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास हे लक्ष्य साध्य केले. त्याने ही चढाई यशस्वी करून नवा इतिहास रचला. त्याने २५ दिवसांत दोन अष्टहजारी शिखरावर चढाई करण्यात यश मिळवले आहे.

मुंबई - पुण्याच्या जितेंद्र गवारे याने जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट सर केले. गिरिप्रेमी जितेंद्रने आज बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास हे लक्ष्य साध्य केले. त्याने ही चढाई यशस्वी करून नवा इतिहास रचला. त्याने २५ दिवसांत दोन अष्टहजारी शिखरावर चढाई करण्यात यश मिळवले आहे. 

जितेंद्रने १६ एप्रिल रोजी गिरिप्रेमीच्या माऊंट अन्नपूर्णा-१ मोहिमेअंतर्गत जगातील दहावे उंच शिखर असलेल्या माऊंट अन्नपूर्णा-१ वर यशस्वी चढाई केली. आता त्याने महिन्याभराच्या आत एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केली आहे. ही दोनही शिखरे आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंच आहेत. एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर आहे, तर अन्नपूर्णाची ८०९१ मीटर. 

जितेंद्रला या दोन्ही मोहिमांसाठी गिरिप्रेमीच्या अष्टहजारी मोहिमांचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे व तीन अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारे डॉ. सुमीत मांदळे यांचे मार्गदर्शन लाभले. जितेंद्रने यापूर्वी २०१९ मध्ये जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या माऊंट कांचनजुंगावर तिरंगा फडकविला होता. तसेच त्याचवर्षी माऊंट अमा दब्लम या तांत्रिकदृष्ट्या अतिशय खडतर असलेल्या शिखरावर यशस्वी चढाई करून आपले कौशल्य सिद्ध केले होते. एव्हरेस्ट मोहिमेतील अंतिम टप्प्याच्यावेळी बोचरी थंडी होती, तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते, पण वाऱ्यांचा वेग तुलनेत कमी असल्यामुळे  आव्हान माफकच सुकर झाले. अर्थात अन्य आव्हाने कस पाहणारीच होती, असे जितेंद्रच्या संपर्कात असलेल्या नचिकेत जोशी यांनी सांगितले. 

या मोहिमेदरम्यान जितेंद्रला पुण्यातून एव्हरेस्ट शिखरवीर गणेश मोरे, गिर्यारोहक विवेक शिवदे हे सातत्याने सूचना करीत होते, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. अविनाश कांदेकर यांनी हवामानाचे अचूक अंदाज जितेंद्रला कळविले. त्यामुळे जितेंद्र व त्यांचा शेर्पा साथीदार पासांग झारोक शेर्पा यांना एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करता आली.  जितेंद्र पुण्यातील वडगाव शेरी येथील रहिवासी आहे. 

अंतिम टप्पा सुरू होण्यापूर्वी जितेंद्रबरोबर बोलणे झाले होते. एका सेशनमध्ये २ हजार ८०० मीटर शिखर चढाई करून थोडा थकवा जाणवत आहे, पण हे साध्य करू शकलो याचे त्याला समाधान होते. आनंद होता. हा जोषच अंतिम चढाईसाठी प्रेरक ठरतो.
- उमेश झिरपे


​ ​

संबंधित बातम्या