चावा घेतल्यानंतरही रवीची विजयी पकड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 August 2021

पकड घेतलेल्या उजव्या हाताला नूरीस्लामकडून चावा घेतल्यानंतरही रवी दहिया अचल राहिला. त्याने प्रतिस्पर्धी चीतपट झाल्याची खूण केल्यावरच पकड सोडली आणि ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेतील ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

टोकियो / मुंबई - पकड घेतलेल्या उजव्या हाताला नूरीस्लामकडून चावा घेतल्यानंतरही रवी दहिया अचल राहिला. त्याने प्रतिस्पर्धी चीतपट झाल्याची खूण केल्यावरच पकड सोडली आणि ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेतील ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 

रवीने २-९ पिछाडीनंतर कझाकस्तानच्या नूरीस्लाम सानायेव याला चीत करीत बाजी मारली. सामन्यातील काही सेकंद असताना रवीने दुहेरी पट काढत खाली खेचले. त्याला चीतपट करण्याचा प्रयत्न करताना उजव्या हाताने त्याला उठण्यापासून रोखत होता. याचवेळी सानायेवने त्याच्या उजव्या दंडाचा जोरदार चावा घेतला, तरीही रवीने त्याच्यावरील पकड सोडली नाही. हे पाहून सानायेवचा चावा घट्ट झाला, पण त्यानंतरही रवी अचल राहिला. त्याने सानायेव चीतपट असल्याचा कौल मिळविल्यावरच पकड सोडली. अगदी रवी चीतपट केल्यावर उठत असतानाही चावा सुटलेला नव्हता. त्यामुळे रवीच्या उजव्या दंडावर दाताच्या खुणाही उमटल्या. रवीने सामन्यानंतर ही बाब पंचांच्या निदर्शनास आणली आहे. नूरीस्लामवर दोन वर्षांची बंदी येऊ शकते.


​ ​

संबंधित बातम्या