ज्युनियर विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत संजू देवी, भातेरी अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 August 2021

रशियातील उफा या शहरात सुरू असलेल्या ज्युनियर विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत संजू देवी (६२ किलो) आणि भातेरी (६५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठून भारताची आणखी दोन पदके निश्चित केली. सानेहचा (७२ किलो) मात्र उपांत्य फेरीत पराभव झाला. ती आता ब्राँझ पदकासाठी लढेल.

मुंबई - रशियातील उफा या शहरात सुरू असलेल्या ज्युनियर विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत संजू देवी (६२ किलो) आणि भातेरी (६५ किलो) यांनी अंतिम फेरी गाठून भारताची आणखी दोन पदके निश्चित केली. सानेहचा (७२ किलो) मात्र उपांत्य फेरीत पराभव झाला. ती आता ब्राँझ पदकासाठी लढेल.

संजू शरीरयष्टी अॅथलीटच्या साजेशी नसली तरी तिची चपळता थक्क करणारी होती. तिने जर्मनीच्या लुसिया स्क्रेलचा ५-२ असा पराभव करून मोहीम सुरू केली आणि त्यानंतर ०-३ अशी पिछाडी कमी करून क्रोएशियाच्या इवा ग्रेसीवर ४-३ असी बाजी पलटवली व उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य सामन्यात तिने अझरबैजानच्या बिरगुल सोल्तानोवाचा ८-५ असा पराभव केला.

चांगला ड्रॉ मिळाल्यामुळे पुढे चाल करण्यास अडथळे न आलेल्या भातेरीने रुमानियाच्या अमिना कॅपेझानवर उपांत्य फेरीत विजय मिळवला. हा सामना २-२ अशा बरोबरीवर होता, परंतु तांत्रिकदृष्ट्या भातेरी वरचढ असल्याचा निर्णय रेफ्रींनी दिली आणि तिला अंतिम फेरी गाठता आली.

सानेहला अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले नव्हते, बेलारूसच्या क्सेनिया पाटापोविचवर ६-२ असा विजय मिळविल्यावर मंगोलियाच्या त्सोगजोलमावर ७-० अशी सहज मात केली होती, परंतु उपांत्य सामन्यात तिला अमेरिकेच्या केनेडी ब्लादेसने ११-० असे लोळवले.

इतर खेळाडूंमध्ये पिंकीने ५-४, ७-६ अशी आघाडी घेत चांगली सुरुवात केली होती, परंतु तुर्कस्तानच्या एमिनी कॅकमाकने अंतिम क्षणी खेळ उंचावत १२-७ असा पिंकीवर विजय मिळवला. ५७ किलो गटांत खेळणाऱ्या मानसीने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या क्लेरी मारेईवर १६-४ अशी मत केली; मात्र पुढच्या फेरीत तुर्कस्थानच्या एलविरा कामालोऊसमोर ती १-९ असे पराजित झाली.


​ ​

संबंधित बातम्या